आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्यातून जन्माला आला ‘सायकल पोलो’ खेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-सायकल पोलो खेळाचा इतिहास मोठा रंजक आहे. सैनिक व जुन्या संस्थानिकांनी या खेळाला जन्म दिला असून, आज तो देशभर खेळला जात असल्याची माहिती ऑल महाराष्ट्र सायकल पोलो असोसिएशनचे महासचिव गजानन बुरडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. राज्यस्तरीय ज्युनियर मुले सायकल पोलो स्पर्धेनिमित्त ते अकोल्यात आले होते.
बुरडे म्हणाले की, पूर्वी अत्याधुनिक शस्त्र नसल्याने तलवार, भाले आदींनी युद्ध चालायचे तसेच बॉम्बगोळ्यांऐवजी तेलाचे गोळे शत्रूंवर फेकले जात. त्याचा सराव घोड्यांवरून होत होता. जुन्या संस्थानिकांकडेही मोठय़ा प्रमाणात घोडे होते. त्या वेळी घोड्यांवर सराव म्हणून अशा पद्धतीचा खेळ खेळला जात होता. दुसर्‍या महायुद्धानंतर अत्याधुनिक शस्त्रे आल्यानंतर सैन्यातील घोड्यांची संख्या कमी झाली. सायकलींचा शोध लागला आणि सायकल पोलो खेळाचा जन्म झाला. 1966 मध्ये तत्कालीन उपसंरक्षणमंत्री एम. आर. कृष्णा यांनी पुढाकार घेऊन सायकल पोलो फेडरेशनची स्थापना केली. आता राष्ट्रीय स्पर्धेत 20 पेक्षा अधिक राज्यांचे संघ तसेच आर्मी, एअरफोर्सचेही संघ सहभाग घेतात.
महाराष्ट्रात या खेळाची मुहूर्तमेढ 1975 मध्ये रोवली गेली. नागपूर येथील स्वातंत्र्यपूर्व काळातील सुभाष मंडळाने पुढाकार घेऊन राज्य सायकल पोलो संघटनेची स्थापना केली. आज राज्यातील 28 जिल्ह्यांमध्ये सायकल पोलोच्या स्पर्धा होतात. ज्युनियर, सबज्युनियर व सीनियर अशा तीनही गटांत राज्यातील महिला व पुरुषांनी आजवर चांगली कामगिरी बजावली असून, सुवर्ण, रजत, कांस्यपदक पटकावले आहे. 2006-07 मध्ये शालेय खेळांमध्ये सायकल पोलोचा समावेश केला आहे.
असा आहे सायकल पोलो :
या खेळासाठी 140 मीटर लांबीचे व 80 मीटर रुंदीचे मैदान असते. संघात एकूण आठ खेळाडू असतात. यापैकी चार मैदानात खेळतात, तर चार राखीव असतात. दोन पंच मैदानात, तर मैदानाबाहेर एक गुणलेखक व एक टाइमकिपर असतो.सायकलला स्टँड, घंटी, मडगार्ड आदी असत नाही. केवळ दोन चाके, ब्रेक व सीट असते. खेळाडूच्या हातात हॉकीप्रमाणे एक स्टिक असून, टेनिसबॉलला सायकलीवरून या स्टिकच्या साहाय्याने टोलवत प्रतिस्पध्र्यांवर गोल करायचा असतो.