आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा शल्यचिकित्सकांवर वाशीममध्ये युवतीचा हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम- जिल्हा सामान्य रुग्णालयात कंत्राटी परिसेविका पदाच्या मुलाखतीसाठी आलेल्या यवतमाळ येथील सरिता सिरसाट (22) या युवतीने शुक्रवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. व्ही. डी. क्षीरसागर यांना शिवीगाळ करून त्यांच्या दिशेने दगड भिरकावला. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, पोलिसांनी सदर तरुणीला अटक केली आहे.
|
राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांत मुलाखतीद्वारे कंत्राटी परिसेविकांची भरती करण्यात येणार आहे, अशी जाहिरात आरोग्य विभागाकडून एका दैनिकात प्रसिद्ध झाली होती. त्यात 25 जुलै रोजी त्या-त्या जिल्ह्यांत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे स्पष्ट लिहिलेले होते. मात्र, वाशीम जिल्ह्यात परिसेविकांच्या जागाच रिक्त नसल्याने या ठिकाणी ही भरती होणार नाही, अशी पुरवणी जाहिरात तीन दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती. पण ती वाचण्यात आली नसल्याने राज्याच्या विविध भागांतून अनेक युवती शुक्रवारी मुलाखतीसाठी वाशीममध्ये आल्या होत्या.
डॉ. क्षीरसागर यांनी त्यांना या रुग्णालयात जागाच रिक्त नसल्याचे सांगितले. तसेच प्रसिद्ध जाहिरातही दाखवली. मात्र, अगोदरच नियुक्त्या केल्यानेच टाळाटाळ होत असल्याचा आरोप सरिताने केला. डॉ. क्षीरसागर यांच्याशी तिने वादही घातला. इतकेच नव्हे तर शिवीगाळ करत त्यांच्या दिशेने दगड फेकला. सुदैवाने यात क्षीरसागरांना मोठी इजा झाली नाही.

शांततेने सांगत होतो
मुलाखतीसाठी आलेल्या युवतींना मी सांगत होतो की, वाशीम आरोग्य विभागाची कुठलीही पद भरती नाही. त्यासंबंधी त्यांना पुरवणी जाहिरातीचा पुरावा दिला. पण सरिताने ऐकले नाही. उलट मला मारण्याचा प्रयत्न केला.
-डॉ. व्ही. डी. क्षीरसागर, शल्यचिकत्सक

घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी दिवसभर काम बंद आंदोलन केले. त्यामुळे सकाळी 10.30 नंतर एकाही रुग्णाची तपासणी झाली नाही. केवळ गंभीर रुग्णांवर उपचार करण्यात आले. शिवाय सर्व कर्मचार्‍यांनी शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना निवेदन देऊन सरितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.