आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खारपाणपट्ट्यातील समस्या - सिंचन पद्धतीतील बदलांना मंजुरी मिळून झाले वर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - खारपाणपट्ट्यातील जमिनीतील क्षाराचे प्रमाण लक्षात घेऊन या भागात पारंपरिक सिंचन पद्धतीत बदल करण्यात आला आहे. या बदलाला नियामक मंडळाने मंजुरी देऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. परंतु, अद्यापही अंदाजपत्रकापासून निविदा प्रक्रिया आदी कोणत्याही कामांना पाटबंधारे विभागाने प्रारंभ केला नाही. विशेष म्हणजे खारपाणपट्ट्यातील काही प्रकल्पांचे काम ६० टक्क्यांपर्यंत झाले आहे.
अकोला जिल्ह्यात एक लाख ९३ हजार हेक्टर जमिनीवर खारपाणपट्टा पसरला आहे. हा सर्व पट्टा पूर्णा नदीच्या दोन्ही पात्रालगत पसरला आहे. या भागात जमिनीत क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने जमिनीतील पाणी पिण्यायोग्य नाही. एवढेच नव्हे, तर जनावरांनाही हे पाणी पिता येत नाही. त्यामुळे या भागात पाण्याची समस्या तीव्र आहे. ही बाब लक्षात घेऊन आणि खारपाणपट्ट्याला थोपवण्यासाठी या भागात जास्तीत जास्त प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहे.
यात नेरधामणा, कवठा, उमा, काटेपूर्णा, घुंगशी, काटीपाटी आदी प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांचे कामही सुरू केले आहे. परंतु, या सर्व प्रकल्पांतर्गत सिंचनाला पाणी देण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा (कालव्याचा) अवलंब करता प्रोटेक्टिव्ह इरिगेशन करण्याच्या हेतूने पाइपलाइनच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.

तूर्तास सुरू असलेल्या प्रकल्पांपैकी पूर्णा नदीवरील तेल्हारा तालुक्यात बांधण्यात येणाऱ्या नेरधामणा बॅरेजचे काम ६० टक्के झाले आहे, तर उमा नदीवर मूर्तिजापूर तालुक्यात बांधण्यात येणाऱ्या उमा बॅरेजचे काम ५० टक्केवर पोहोचले आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पाइपलाइनच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय झाला. नंतर या निर्णयाला नियामक मंडळाने डिसेंबर २०१३ मध्ये मंजुरी दिली. अद्याप कामाला प्रारंभ झाल्याने प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यानंतर केल्या जाईल का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे.

भूसंपादनाची गरज नाही: पाइप जमिनीखालून जाणार असल्याने भूसंपादनासाठी लागणारा वेळ, पैसा आदी वाचणार असून, कामाला गती येण्यास मदत मिळणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
१६० किमी पाइपलाइन : उमा,नेरधामणा प्रकल्पांतर्गत सिंचनासाठी १६० कि.मी.ची पाइपलाइन टाकली जाणार आहे. नेरधामणा प्रकल्पांतर्गत ९० कि.मी , तर उमा प्रकल्पांतर्गत ७० किमीची पाइपलाइन टाकली जाणार आहे.
साडेबारा हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली : सिंचनाचा लाभ मिळणाऱ्या या ४५ गावांतील एकूण १४ हजार ४६४ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांची कोरडवाहूपासून मुक्तता होणार आहे.त्याचा फायदा बळीराजाला होईल.
अमरावती कार्यालयात रखडली फाइल : अकोला पाटबंधारे विभागातून नियामक मंडळाने मंजुरी दिल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी फाइल अमरावती पाटबंधारे विभागाकडे पाठवली आहे. परंतु, अद्याप वरिष्ठ कार्यालयातून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
तहान लागल्यावर विहीर खोदणार काय?
प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना पाइपलाइन टाकण्याचे काम रखडल्यामुळे पुन्हा सिंचनासाठी वाट पाहावी लागेल. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे.'' दिवाकर देशमुख,लाभार्थी,मुंगशी (नेरधामणा प्रकल्प)
स्प्रिंकलरचाही वापर करावा लागेल
शेतकऱ्यांनी पाइपमधून मिळालेले पाणी पारंपरिक पाट पद्धतीचा वापर करून दिल्यास काहीही फायदा होणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना स्प्रिंकलरचाच वापर करावा लागेल.'' डॉ. सुभाषटाले, विभागप्रमुख जल मृद संधारण अभियांत्रिकी, पीकेव्ही
- ४५ गावांना सिंचनाचा लाभ
पूर्णा नदीवरील नेरधामणा प्रकल्पाच्या माध्यमातून अकोला तालुक्यातील १८, अकोट तालुक्यातील २, बाळापूर तालुक्यातील ५, तर तेल्हारा प्रकल्पातील सात तसेच उमा प्रकल्पाच्या माध्यमातून मूर्तिजापूर तालुक्यातील १३ गावे, अशा एकूण ४५ गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
- पारंपरिक पद्धतीत बदल का?
खारपाणपट्टा भागातील जमिनीत क्षाराचे प्रमाण अधिक आहे. कालव्याच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी दिल्यास जमिनीतील क्षार या पाण्यात मिसळले जातील. परिणामी, पाण्यात क्षाराचे प्रमाण वाढेल तसेच कालव्यातून काही अंशी का होईना पाझर होतो. या बाबी लक्षात घेऊन प्रोटेक्टिव्ह इरिगेशन ही संकल्पना समोर आली आहे.
- क्षाराचे शेकडा प्रमाण ते १५%
या जमिनीत मातीच्या कणांवर चिकटलेल्या क्षाराचे (सोडियम) सरासरी शेकडा प्रमाण ३.९७ ते १५.३५ दरम्यान आहे. मात्र, वरच्या भागात हे प्रमाण कमी आहे. क्षाराचे प्रमाण पीएच (जमिनीचा सामू) या पद्धतीनेही मोजले जाते. सामान्य जमिनीत क्षाराचे प्रमाण पीएचपर्यंत असते. परंतु, खारपाणपट्ट्यात क्षाराचे प्रमाण १० ते १३ पीएच आहे.