आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगावकरांना मिळतेय पाच दिवसांआड पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - दरवर्षी खामगावकरांना पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागते, पण गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने ज्ञानगंगा धरणात मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध झाला. यंदा खामगावकरांना पाण्याची समस्या भेडसावणार नाही, असे वाटत असतानाच नगर पालिका प्रशासनाने शहराला तब्बल सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा सदोष असल्यामुळे उशिराने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकातून होत आहे.

पावसाळा सुरु होऊन एक महिन्याच्यावर कालावधी लोटून गेला तरी पाऊस झाला नाही. जो पाऊस पडला तो अल्पसा आहे. यंदा पाऊस नसल्यामुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या उदभवण्याची भीती व्यक्त होत असली तरी खामगाव शहराला पाणी पुरवठा करणा-या 14.68 दलघमी इतका जलसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध असलेल्या या पाण्याची टक्केवारी 43.28 टक्के एवढी आहे. ज्ञानगंगा धरणात मुबलक प्रमाणात जलसाठा उपलब्ध असतांना सुद्धा शहरवासीयांना सहाव्या दिवशी पाणी परवठा केल्या जात आहे. याला सदोष वितरण व्यवस्था कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. मात्र पालिका प्रशासन आपली बाजू राखण्यासाठी नागरिकांना पाण्याच्या काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करत आहे.

तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कमी पाऊस
खामगाव तालुक्यात या वर्षी आतापर्यंत 23.8 मिलीमीटर पाऊस झाला असून, मागील वर्षीच्या तुलनेत हा पाऊस अत्यंत कमी आहे. पावसाळा सुरू होऊनही चांगला पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. मागील वर्षी जून महिन्यात चांगली पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे खामगाव तालुक्यातील पेरण्या आटोपल्या होत्या, तसेच पिकेही डोलताना दिसत होती. या वर्षी मात्र पावसाळ्याचा एक महिना उलटूनही अत्यंत कमी पाऊस झाला आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षी पाच जुलैपर्यंत एकूण 309.2 मिलीमीटर एवढी पर्जन्यवृष्टी झाली होती. तर या वर्षी 12 जूनपर्यंत केवळ 23.8 मिलीमीटर पर्जन्यवृष्टी झाली आहे. या आकडेवारीवरुन मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी आतापर्यंत अत्यंत कमी पाऊस पडला असल्याचे दिसून आले आहे. खामगाव शहरात मागील चार-पाच दिवसांपासून ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. त्यामुळे अधिकच उकाडा जाणवत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत.