आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीप्रश्न पेटला - झेडपी स्थायी समिती सभेत हातपंप वाजला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पावसाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न जिल्ह्यातील ब-याच गावांना भेडसावत आहे. पाणीपुरवठा व भूजल सर्वेक्षण विभागाकडून उपाययोजना करण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप करत हातपंपाच्या दुरुस्तीवरून सभेत पाणीप्रश्न पेटला. उपअभियंता एस. टी. बशिरे यांची जिल्हा परिषद सदस्य शोभाताई शेळके व विजय लव्हाळे यांनी चांगलीच कानउघाडणी केली.
जि.प. स्थायी समितीची सभा 4 ऑगस्ट रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात पार पडली. या वेळी अध्यक्ष शरद गवई, उपाध्यक्ष गुलाम हुसेन गुलाम नबी देशमुख, रामदास मालवे, गोदावरी जाधव, द्रौपदाबाई वाहोकार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. भूजल सर्वेक्षण विभागाचे उपअभियंता एस. टी. बशिरे यांनी हातपंप दुरुस्तीच्या पूरक प्रस्तावास मान्यता मागितली. त्यावर सदस्य शोभाताई शेळके, विजय लव्हाळे, दामोदर जगताप यांनी बशिरेंना धारेवर धरले. पूर्ण माहितीसह प्रस्ताव पुढील सभेत सादर करण्याची सूचना या वेळी सदस्यांनी केली, तर 10 टक्के लोकवर्गणीतून हातपंप दुरुस्तीची कामे व्हावीत, असा ठराव सभेत घेण्यात आला. महाजल योजनेतील गैरव्यवहार केल्याप्रकरणी उपअभियंता इंगळे यांची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय त्यांची बदली करण्यात येऊ नये, अशी सूचना सदस्या शोभाताई शेळके यांनी केली. सदस्य रमण जैन यांनी शिक्षक प्रभाकर रूमाले, राजू राठोड व चव्हाण यांच्या प्रतिनियुक्त्या रद्दची सूचना केली.

ग्रामसेवक वाघ यांची बदली रद्द :
ग्रामपंचायत गोरेगाव खुर्द येथे असताना एक लक्ष तीन हजार रुपयांची अफरातफर करणा-या भोड येथील ग्रामसेवक केशव पांडुरंग वाघ यांच्या बदलीबाबत सदस्य शेळके यांनी आक्षेप नोंदवला. त्यामुळे सभागृहाने वाघ यांची गोरेगाव खुर्द येथे बदली न करता त्यांना भोड येथेच ठेवण्यात यावे, असा ठराव घेतला.

सगळ्या कंपन्या बंद करू का साहेब?
जिल्ह्यात बोगस बियाणे मोठ्या प्रमाणात आढळले. याप्रकरणी कृषी विभागाच्या अधिका-यांनी अद्याप त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. आतापर्यंत 110 तक्रारी प्राप्त आहेत. कृषी केंद्र व कंपन्यांना कृषी विभाग पाठीशी घालत असल्याचा आरोप करत चंद्रशेखर पांडे यांनी कृषी विकास अधिकारी गांधी यांना जाब विचारला. गांधी एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. चिडलेल्या कृषी विकास अधिका-यांनी तावात सगळ्या कंपन्या बंद करू का साहेब, असे निरर्थक उत्तर दिल्याने सभागृहातील इतर सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली.

निरीक्षक आर. एस. गवर्इंना शोकॉज
टिनपत्रे खरेदीचे पत्र देऊनही समाजकल्याण विभागाचे निरीक्षक आर. एस. गवई यांनी उत्तर दिले नाही. पण, सभागृहात मुद्दा उपस्थित होताच पांडे गुरुजींना फाइल दाखवण्याचा प्रयत्न केला. गवई यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले.