आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेडपीच्या सभेत पाणी प्रश्न पेटला, बीडीओंवर निष्क्रियतेचा ठपका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गावात पाणी मिळत नाही म्हणून नागरिकांना शेतातून पाणी आणून तहान भागवावी लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत, तर पाणीटंचाई कृती आराखडा तयार असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत पाणी प्रश्नावरून सदस्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, सभेत ग्रामीण भागात विकासकामामध्ये कुचराई करणार्‍या बीडीओंवर निष्क्रियतेचा ठपका ठेवण्यात आला.

जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. बैठकीला उपाध्यक्ष गुलाम हुसेन गुलाम नबी देशमुख, महिला बालकल्याण समिती सभापती द्राैपदाबाई वाहोकार, समाजकल्याण सभापती गोदावरी जाधव, कृषी पशुसंवर्धन समिती सभापती रामदास मालवे, सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी जावेद इनामदार, शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती, जिल्हा कृषी विकास अधिकारी मामदे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मनोहर तुपकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला एप्रिल रोजीच्या स्थायी समिती सभेच्या इतिवृत्ताला मान्यता देण्यात आली. यानंतर सभेचे सचिव जावेद इनामदार यांनी विषयसूचींचे वाचन केले. विषयसूचीवर विषयांना प्राधान्य देता वेळेवर विषय मांडून सदस्यांनी सभागृहातील अधिकार्‍यांनाच कोंडीत पकडल्याचे दिसून आले. या प्रकाराने जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कुंभारे यांच्यासह अन्य अधिकार्‍यांची बोलतीच बंद झाल्याचे दिसून आले.

ग्रामपंचायतचा निधी अखर्चित : विकासकामांसाठीग्रामपंचायतीला नियोजनमधून निधी देण्यात येतो. मात्र, हा निधी ग्रामसेवक खर्च करत नसल्याने तो अखर्चित राहत आहे. ग्रामसेवकांनी कामे केली नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

बीडीओंना घालतात सीईओ पाठीशी : गटविकासअधिकार्‍यांनी एक निवेदन काय दिले, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी त्यांच्या चुकांवर पांघरूण घालत त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप सदस्य शोभाताई शेळके, चंद्रशेखर पांडे विजय कुमार लव्हाळे यांनी केला.

बोरगावला पाणीपुरवठा
बोरगावमंजूयेथील पाणीटंचाई लक्षात घेता सदस्य चंद्रशेखर पांडे यांनी सुकळी प्रकल्पातून बोरगावला पाणीपुरवठा करण्याची मागणी रेटून धरली. सभागृहाने मान्यता दिल्याने प्रकल्पातून बोरगावला पाइपलाइनद्वारे पाणी पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. ९६ लाख रुपयांतून सुकळी प्रकल्पाचे काम सुरू आहे.

विषय सूचीचा पडला विसर
सभासुरू झाल्यावर सदस्यांना विषयसूचीचा विसर पडलेला दिसून आला. सदस्यांनी विषयसूचीवरील विषयांना दुय्यम स्थान देत इतर आपल्या मर्जीतल्या विषयांना मांडून अधिकार्‍यांना जेरीस आणले. वेळेवर माहिती सादर करू शकल्याने उलट सदस्यांनी अधिकार्‍यांची परेड घेतली.

घरकुलाचा प्रश्न कायम
गटविकासअधिकार्‍यांच्या निष्क्रियतेमुळे पंचायत समिती स्तरावर घरकुलाचा प्रश्न निकाली लागत नसल्याचा आरोप सदस्य रमन जैन, पुंडलिक अरबट यांनी केला. याप्रकरणी बीडीओंना वारंवार सांगूनही काहीही उपयोग होत नाही. गटविकास अधिकारी हे लीडर बनले असून, त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाही वचक राहिला नाही, असा आरोप सदस्य पांडे गुरुजी शोभाताई शेळके यांनी केला.

१५ मिनिट सभा स्थगित
गटविकासअधिकार्‍यांच्या मुद्द्याहून सीईओंना जबाबदार धरत सदस्यांनी १५ मिनिटांसाठी सभा स्थगित केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांनी सीईओंसोबत संपर्क केला. सीईओंनी बीडीओंचे पत्र प्राप्त झाले असून, त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभेस उपस्थित राहण्याचे बंधनकारक नाही, असा निरोप दिला. या प्रकाराने सदस्य चांगलेच भडकले. सीईओंमुळे बीडीओ बिघडले असल्याचा आरोप सदस्यांनी केला.

अधिकार्‍यांची अनुपस्थिती
नेहमीप्रमाणे गटविकास अधिकार्‍यांनी सभेस अनुपस्थिती दर्शवली. गटविकास अधिकारी सभेसही उपस्थित राहत नाही अन् सदस्यांना माहितीही वेळेवर देत नाहीत, असा आरोप सदस्यांनी केला. त्यामुळे अध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, बार्शिटाकळी येथील गटविकास अधिकार्‍यांची थेट प्रधान सचिवांकडे तक्रार करा, अशी सूचना सदस्यांनी केली.

अभियंत्याकडील प्रभार काढा : बांधकाम विभागाचे अभियांता प्रकाश रणबावरे यांच्याकडील अतिरिक्त प्रभार काढून घेण्याची मागणी केली.

(फोटो : बीडीओंच्या नाकर्तेपणामुळे ग्रामीण विकास खुंटल्याचा आरोप करताना सदस्या शोभाताई शेळके, चंद्रशेखर पांडे, विजयकुमार लव्हाळे इतर.)