आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जलतारे नव्हे ‘जल’तोडे; जलतारेंमुळे 14 कोटींचे नुकसान: आमदार डॉ. पाटील यांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र जलतारे हे शेतकर्‍यांसाठी जलतारे न ठरता ते जलतोडे ठरल्याचा गंभीर आरोप आमदार डॉ. रणजित पाटील यांनी केला आहे. जलतारेंच्या दुर्लक्षामुळे साडेसात कोटींचा निधी परत गेला तर साडेसहा कोटींचे पीक सिंचनाअभावी आलेच नाही. त्यामुळे अशा अधिकार्‍यांवर शासनाने त्वरित कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार डॉ. रणजित पाटील यांनी केली आहे.

जागतिक बँकेच्या निधीतून काटेपूर्णा क्षेत्रातील सिंचनाची कामे जून महिन्यात होणे आवश्यक असताना साडेसात कोटीचा निधी खर्चच झाला नाही. गेली दोन वर्षे कामे धिम्या गतीने सुरू असताना जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले, असा आरोप आमदार डॉ. रणजित पाटील यांनी केला आहे. काटेपूर्णा प्रकल्प क्षेत्रामध्ये कॅनलच्या कामामध्ये अनियमितता दिसून येत आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी आणि दिरंगाई करणार्‍या कंत्राटदारांवर त्वरित कारवाई करा. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी खोळंबलेली कामे पूर्ण करा, असे निर्देश आ. पाटील यांनी सोमवारी ‘सिंचन यात्रे’दरम्यान बोलताना दिला.

जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र जलतारे, सहायक अभियंता एस. एस. सोळंके हेही या पाहणी दौर्‍यात होते. आ. पाटील यांनी काही ठिकाणी झालेल्या निकृष्ट कामाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. निर्धारित वेळेत कामे पूर्ण होत नाही हे दिसत असूनही प्रशासनाने कंत्राटदारांविरुद्ध वेळीच कारवाई का केली नाही. तसेच निधी वेळेत खर्च होणार नाही याबाबत शासनाला प्रस्ताव का पाठवला नाही, अशी विचारणा अधिकार्‍यांना केली. जागतिक बँकेने मार्चनंतर निधी गोठवला असला तरी दुसर्‍या हेडखाली पैसे आणून खोळंबलेली कामे पूर्ण करा. निधीसंदर्भात आपण जलसंधारण मंत्री सुनील तटकरे यांच्याशी बोललो आहे. शेतकर्‍यांच्या हिताआड येणार्‍या कंत्राटदारांची गय करू नका, त्यांना काळ्या यादीत टाकून कामे देणे बंद करा, असेही आ. पाटील म्हणाले. गेल्या तीन दिवसांपासून या भागाची पाहणी करून आ. डॉ. पाटील यांनी समस्येच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला.
विकासाचे स्वप्न
सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी 1999 पासून या कामांना गती आली. 2000 मध्ये माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या हस्ते योजनेचे उद्घाटन झाले होते. काटेपूर्णा प्रकल्पापासून खांबोरा ते पुढे भटोरीपर्यंत 17.44 किलोमीटर क्षेत्रात कॅनलद्वारे शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पाणी वापर संस्थांच्या प्रयत्नातून सिंचनात भर पडली आहे. सुमारे सात हजार हेक्टर क्षेत्र सिंचन वाढले आहे.
ठेकेदारांच्या मनमानीपुढे यंत्रणा हतबल झालेली दिसली. कोठारी, तामशी सर्कलमध्ये काटेपूर्णा कॅनल फुटला, झाडे उगवली. पैलपाडा मायनरमध्ये कॅनलचे काम अपूर्ण, साडेसतरा किमी अंतर क्षेत्रात बर्‍याच ठिकाणी अनियमितता, कामे अर्धवट झालेली असताना बिले अदा झालीत का, याची माहिती आपण घेणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
नुकसान खपवून घेणार नाही
सिंचनासाठी मिळालेले पैसा खर्च करण्यात आमचे अधिकारी सक्षम ठरत नाही. कंत्राटदारांना पोसण्याचा उद्योग बंद करा. शेतकर्‍यांच्या विकासाच्या आड येणार्‍यांना सोडणार नाही. अधिकारी असो की कंत्राटदार त्यांना उघडे पाडू. ’’
- डॉ. रणजित पाटील, आमदार.
गाळ टाकल्याने अडचण
कालवा उपसून रस्त्यावर गाळ टाकल्याने शेतकर्‍यांची अडचण होत आहे. पावसाळ्यात तर शेतात जाणेदेखील कठीण होईल.’’
- मनोज तायडे, अध्यक्ष, प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था.
ठेकेदार वेठीस धरत आहे
भटोरी-2 योजनेची कामे ठेकेदाराने केलेली नाही. रेती उपलब्ध आहे, मशिनरी आहे, तरीदेखील कामे होत नाही. कॅनलची स्वच्छता झालेली नाही. आम्ही पाणी उचलले नाही. तरी शेतकर्‍यांना ठेकेदार वेठीस धरत आहे.’’
- संजय जायले, रामगोपाल पाणी वापर संस्था, भटोरी
दोन कंत्राटदारांना केले निलंबित
काटेपूर्णा प्रकल्पातील दुसर्‍या टप्प्यातील सात कामे नॉमर्समध्ये बसत नव्हते. परंतु, जागतिक बँकेची मंजुरी मिळाल्याने काम मार्गी लागले. 2012 मध्ये सात कामे अंतर्भूत केली. यातील चार कामे चांगली झाली, परंतु दोन कामे निकृष्ट झाली. दोन कंत्राटदारांना निलंबित करीत आहोत. भटोरी-2 ची कॅनल, रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी होतील.’’
- राजेंद्र जलतारे,अधीक्षक अभियंता, जलसंधारण विभाग.