आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाण्याचा पुरवठा होत नसल्याने वाद; महिलांची व्हॉल्व्हमनसोबत बाचाबाची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - आरटीओ कार्यालयरोड परिसरातील गौतमनगर भागाला गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने या भागातील संतप्त झालेल्या महिलांनी केशवनगर भागातील जलकुंभावरील व्हॉल्व्हमनसोबत वाद घातला. शहर अभियंता अजय गुजर यांनी घटनास्थळ गाठून महिलांना शांत केले.

गौतमनगर भागाला केशवनगर भागातील जलकुंभावरून पाणीपुरवठा होतो. जलकुंभापासून गौतमनगर वस्ती दूर असल्याने तसेच काही महिन्यांपूर्वी जलवाहिनी नादुरुस्त झाल्याने या भागाला पाणीपुरवठा होत नाही, तर दुसरीकडे हातपंप व सबमर्सिबल पंपही बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी या भागातील महिलांनी शहर अभियंता अजय गुजर यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. परंतु, जलवाहिनी बदलण्यासाठी निधी नसल्याने तूर्तास हातपंप व सबमर्सिबल पाणीपुरवठा विभागाने दुरुस्त केला. परंतु जलवाहिनी न बदलल्याने पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे महिलांनी 22 जूनला जलकुंभ गाठून व्हॉल्व्हमनवर संताप व्यक्त केला. अभियंता अजय गुजर यांनी महिलांची समजूत काढून हा वाद मिटवला.
अकोला । प्रभाग क्रमांक 29 मध्ये पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याने या प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी कामे करावी, अशी मागणी भारिप-बमसंचे गटनेते गजानन गवई यांनी आयुक्तांकडे निवेदनातून केली आहे.

हमजा प्लॉट, गुडवाले प्लॉट, मोळकेवाडी, भागीरथवाडी, अंबिकानगर, यशवंतनगर, सिद्धार्थवाडी, प्रकाशनगर, पंचशीलनगर, कमलानगर, लहरियानगर, सागर कॉलनी, रूपचंदनगर, गीतानगर, महेश कॉलनी आदी भागांत कापशी तलाव पाणीपुरवठा योजनेच्या काळात जलवाहिन्या टाकल्या होत्या. परंतु, कापशी तलाव पाणीपुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित करताना या जलवाहिन्या काढण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पंचशीलनगर, संतोष किराणा ते सार्वजनिक स्वच्छतागृह, कमलानगर कमान ते बी. आर. शिरसाट हायस्कूल, सिद्धार्थवाडी, गोवर्धन मार्केट ते निर्मल स्वच्छतागृह, सागर कॉलनी व लहरियानगर या भागात जलवाहिन्या टाकाव्यात. अंबिकानगर, यशवंतनगर, सिद्धार्थवाडी, प्रकाशनगर या भागात सबमर्शिबल पंप बसवण्यात यावा, अशी मागणी या निवेदनातून गजानन गवई यांनी केली आहे.