आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या उचलीमुळे होणार हाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहराची 2021 ची लोकसंख्या गृहीत धरून काटेपूर्णा प्रकल्पात आरक्षित केलेल्या पाण्याची उचल सात वर्षांआधीच केली जाणार आहे. आरक्षित जलसाठय़ाव्यतिरिक्त 2 दशलक्षघनमीटर पाणी उपलब्ध करण्याचे आव्हान मनपासमोर आहे.

काटेपूर्णा प्रकल्पातून 1976 ला प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरू झाला. त्या वेळी शहराची 2021 ची लोकसंख्या गृहीत धरून 86 दशलक्षघनमीटर साठवण क्षमतेच्या या प्रकल्पात 24.3 दशलक्षघनमीटर पाणी आरक्षित केले. फेब्रुवारी 2013 पर्यंत सरासरी महिन्याकाठी 1.65 दशलक्षघनमीटर, तर वर्षाकाठी 18 ते 20 दशलक्षघनमीटर पाण्याची उचल केली जात होती. परंतु, मार्च महिन्यापासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. पूर्वी दरडोई 100 लिटर पाणीपुरवठा होत असे, आता दरडोई 135 लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे महिन्याकाठी सरासरी 2.15 दशलक्षघनमीटर पाण्याची उचल केली जात आहे. वर्षाचा विचार केल्यास शहराला 25.80 दशलक्षघनमीटर पाण्याची गरज भासणार आहे. परंतु, काटेपूर्णा प्रकल्पात 24.3 दशलक्षघनमीटर साठा आरक्षित असल्याने उर्वरित 1.80 दशलक्षघनमीटर पाणी उपलब्ध करण्याचे आव्हान आहे. दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय चुकल्याची चर्चा अधिकार्‍यांमध्ये सुरू आहे.

आरक्षण असूनही नसल्यासारखे :
काटेपूर्णा प्रकल्पाप्रमाणेच मोर्णा प्रकल्पात 5 दशलक्षघनमीटर पाणी आरक्षित केले आहे. परंतु, पातूर तालुक्यात असलेल्या या मोर्णा प्रकल्प ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी नसल्याने प्रकल्पात आरक्षण असूनही पाण्याची उचल मनपाला 14 वर्षांपासून करता आलेली नाही.
कापशी तलावाचीही तीच बोंब
एकेकाळी शहराची तहान भागवणार्‍या कापशी तलावातूनही पाण्याची उचल केली जात नाही. कापशी तलाव परिसरात जलशुद्धीकरण केंद्र नाही, तर शहरातील जुने जलशुद्धीकरण केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे 3 ते 5 दशलक्षघनमीटर जलसाठय़ाचा उपयोग करता येत नाही.