अकोला- कापशी तलाव पाणीपुरवठा योजनेनंतर नागरिकांची तहान भागवणारी व पाणीटंचाईच्या काळात महत्त्वपूर्ण ठरलेल्या कौलखेडा पाणीपुरवठा योजनेतील पंपिंगसह जलशुद्धीकरण केंद्र धूळ खात पडून आहे. या योजनेतील लाखो रुपयांच्या साहित्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने यापैकी बरेचसे साहित्य लंपास झाले आहे.
कापशी तलाव पाणीपुरवठा योजना वाढत्या लोकसंख्येमुळे अपुरी पडू लागल्याने 1951 ला मोर्णा नदीवर कौलखेडा पाणीपुरवठा योजना आखण्यात आली. 22 लाख रुपयांचे कर्ज उभारून या योजनेचे काम सुरू करण्यात आले. 1962 ला ही योजना कार्यान्वित झाली. मोर्णा प्रकल्पातून सोडलेले पाणी मोर्णा नदीवर सिमेंट काँक्रीटचा बंधारा घालून अडवण्यात आले. याच भागाला अनिकट म्हणतात. या योजनेचे पंपिंग हाऊस हिंगणा येथे तर जलशुद्धीकरण केंद्र नेहरू पार्क चौकात बांधण्यात आले. काटेपूर्णा प्रकल्पातून शहराला 1976 पासून पहिल्या टप्प्यातून पाणीपुरवठा सुरू झाला तेव्हापासून या योजनेकडे दुर्लक्ष झाले. तरी 2004-2005 या पाणीटंचाईच्या काळात मोर्णा नदीवर हिंगणा येथे कच्चा बंधारा बांधून या योजनेतून पाणीपुरवठा करण्यात आला.
पंपिंग हाऊसमधील मोटर्सचा काहीही पत्ता नसून नेहरू पार्क चौकातील जलशुद्धीकरण केंद्रातील पंपाचे साहित्यही लंपास झाले आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील उपकरणांचे काही भाग भामट्यांनी लंपास केले आहेत. विशेष म्हणजे योजनेतील लाखो रुपयांचे साहित्य बेवारस स्थितीत पडले आहे. शहराची होणारी हद्दवाढ, मोर्णा प्रकल्पातील पाच दशलक्ष घनमीटर आरक्षित पाणी लक्षात घेता, कौलखेडा पाणीपुरवठा योजनेतील पंपिंग हाऊस तसेच नेहरू पार्क चौकातील जलशुद्धीकरण केंद्र शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.