आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकार्‍यांच्या दिरंगाईमुळे गावांत पाणीटंचाईचे सावट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकर पुरवण्याचे अधिकार असतानाही तहसीलदारांकडून त्याचा वापर होत नाही. तसेच निवडणुकीच्या वेळी शुद्ध मुबलक पाणीपुरवठ्याचे आश्वासन देणार्‍या आमदार, जिल्हा परिषद सदस्यांनाही आपल्या कर्तव्याचा विसर पडला आहे.

जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जानेवारी ते मार्च तीन महिन्यांसाठी तयार केलेल्या पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार एकूण २७९ गावांमध्ये ३२२ प्रकारच्या उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. यामध्ये बुडक्या घेणे, विहीर खोल करून गाळ काढणे, विहीर अधिग्रहण, टँकर बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा, प्रगतिपथावरील नळ योजना, नळ योजना विशेष दुरुस्ती, तात्पुरती नळ योजना आदी उपाययोजनांचा समावेश होता. मंजूर आराखड्याला जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरीदेखील दिली होती. मात्र, यापैकी केवळ १० टक्केच योजना मार्गी लागल्या आहेत. त्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच पाणीटंचाई जाणवायला लागली. भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील ४८० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने एप्रिल ते जून २०१५ दरम्यान निर्माण होणार्‍या पाणीटंचाईच्या उपाययोजनासाठी कृती आराखडा तयार केला. त्यानुसार १५९ गावांमध्ये २५८ प्रकारच्या उपाययोजना कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनी प्रस्तावित केल्या. मात्र, तालुकास्तरीय गटविकास अधिकार्‍यांकडून िडमांड नोट प्रस्ताव पाठवण्यास विलंब होत असल्याने उपाययोजनांची अंमलबजावणी थांबली आहे. लोकप्रतिनिधींना कर्तव्याचा विसर पडला आहे.

शेतातून आणतो पाणी
गावात पाणी नसल्याने आम्हाला शेतातून पाणी आणावे लागते. नळ योजना बंद आहे. त्यामुळे तहसीलदारांनी तत्काळ दखल घेऊन गावात पाण्याचे टँकर पाठवावे.'' श्रीकृष्ण गावंडे, ग्रामस्थ, बोंदरखेड
उपाय योजनांना सुरुवात
पाणीटंचाई उपाय योजनांना सर्व गावांमध्ये सुरुवात झाली. तलाठी ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत प्रशासनासाेबत समन्वय साधून पाणीटंचाईची माहिती गटविकास अधिकारी तहसीलदारांना द्यावी.'' सुरेंद्र कोपुलवार, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा

मागणी प्रमाणे टँकर पुरवतो
प्रत्येक गावातील परिस्थितीचे अवलोकन करून तलाठ्यांकडून प्राप्त अहवालाच्या आधारावर, मागणीनुसार तहसील कार्यालयामार्फत टँकरद्वारे पाणी पोहोचवल्या जाते.'' संतोष शिंदे, तहसीलदार, अकोला

माणूस नाही
अकोला तालुक्यासह इतर ठिकाणीसुद्धा नळ योजना आहेत. पण, पाणी सोडायला माणूस नसल्याने नळ नियमित येत नाहीत. त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न ग्रामसेवकांकडूनच होत आहे. याची दखलसुद्धा गटविकास अधिकार्‍यांनी घेणे गरजेचे आहे.

या गावामध्ये भीषण पाणीटंचाई
अकोला- सिसा,बोंदरखेड, बाभुळगाव, घुसर, येऊलखेड, डोंगरगाव, मासा
बार्शिटाकळी- काजळेश्वर,रेडवा, अजनी, पुनोती
अकोट- रोहिणखेड
तेल्हारा- सांगवी,पिवंदळ, कऱ्ही