आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोरगावमंजूत पाणीटंचाई; पंधरा दिवसांआड पुरवठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू - उन्हाच्या तडाख्यासोबतच बोरगावमंजू येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घोटभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत असून, येथील पाणीपुरवठा योजनाही वांझोटी ठरल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. शहराला त्वरित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने दखल घेण्याची मागणी जोर धरत आहे.

शहराची वाढती लोकसंख्या पाहता येथे पूर्वी खांबोरा पाणीपुरवठा योजनेमधून पाणी पुरवण्यात येत होते. मात्र, मागील अनेक दिवसांपासून शहरामध्ये पाणीपुरवठाच करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिक दूरवरून पाणी आणून आपली तहान भागवत आहेत. मध्यंतरीच्या काळात तात्पुरती पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली होती. परंतु, शहराला सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही. अखेर ही योजना कुचकामी ठरली अाहे.

सद्य:स्थितीत शहरात असलेले हँडपंपही भूजल पातळी खाली गेल्याने बंद पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना हातची कामे बाजूला सारून रात्री अपरात्री पाणी भरावे लागत आहे. तसेच गुराढोरांनाही पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. येथील रामजीनगरमध्ये असलेले हँडपंपही नादुरुस्त आहेत. पूर्वी शहराला खांबाेरा येथून पंधरा दिवसांआड पाणी पुरवण्यात येत होते. मात्र, आता ही पाणीपुरवठा योजना बंद करून तात्पुरती पाणीपुरवठा योजना सुरू करून पाणीप्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानंतरही शहरामध्ये भीषण पाणीटंचाई आहे. या प्रश्नाकडे संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

नवी पाइपलाइन हवी
रामजीनगरमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथे काही दिवसांपूर्वी पंधरा दिवसांआड पाणी मिळत होते. मात्र, आता तेही बंद आहे. त्यामुळे या भागात नवीन पाइपलाइन टाकून सुरळीत पाणीपुरवठा करण्याची गरज आहे.'' विनोदमोहोड, नागरिक

सुकळी येथून पाणी
अवैध नळ कनेक्शन, अनेक ठिकाणी नळाला तोट्या नसल्यामुळे रामजीनगरात शेवटपर्यंत पाणी पोहोचत नाही. तसेच सुकळी येथून पाणीपुरवठा करून शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येईल.'' एस.आर. दरेकर, शाखा अभियंता, खांबोरा ग्रामीण पाणीपुरवठा योजना.
बातम्या आणखी आहेत...