आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाईमध्ये पाण्यासह पैसा जिरवणार्‍यांवर आता चाप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पाणीटंचाईच्या नावाखाली टँकर लावून लाखो रुपये खाणार्‍या अधिकारी आणि कंत्राटदारांना शासनाने वचक बसवला आहे. पाण्यावर होणारा खर्च पाण्यात जाण्यापासून वाचवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी आता पाण्याच्या टँकरवर जीपीएस अर्थात ग्लोबल पोझिशन सिस्टिम असेल तरच टँकरचे देयक काढा, असा सक्त आदेश शासनाने काढला आहे. त्यामुळे या टँकरच्या किती फेर्‍या झाल्या, याची माहिती शासनाला मिळेल व जितक्या फेर्‍या झाल्या तितकेच देयक शासनाला द्यावे लागेल. यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या नावाखाली होणारी लूट मात्र या माध्यमातून थांबणार आहे.

उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावात पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करण्याचे शासनाचे धोरण आहे. या माध्यमातून जनतेची तहान भागवण्याचा शासनाचा प्रयत्न असतो. पण, असे करताना जनतेची तहान तर भागवली जात नाही. पाण्यावर होणारा खर्च पाण्यात जातो आणि काही कंत्राटदार आणि अधिकार्‍यांची तहान भागवतो. या सर्व गोष्टींना प्रतिबंध घालण्यासाठी आता पाण्याच्या टँकरवर जीपीएस प्रणाली असेल तरच त्या टँकरचे देयक अदा करा, असे फर्मान शासनाने पाठवले आहे. त्यामुळे शासनाच्या या फर्मानामुळे पाण्याचा धर्म न पाळता त्याचा व्यापार करणार्‍यांना चाप बसला आहे.

पाण्याची एक फेरी करत त्या फेरीत अनेक फेर्‍या दाखवण्याचा टँकरचालकांचा गोरखधंदा शासनाने बंद केला आहे. त्यामुळे जितके पाणी वंचितांपर्यंत पोहोचेल तितक्याच टँकरचे देयक अदा केले जाईल. त्यामुळे खोटे देयक तयार करून, लॉगबुक भरणारे टँकरचालक यांचे गोरखधंदे बंद पडणार आहेत. न झालेल्या पाण्याच्या फेर्‍यांचे पैसे आता त्या टँकरचालकाला मिळणारच नाहीत. त्यामुळे जनतेचा व शासनाचा पैसा वाचणार आहे.

काय आहे ‘जीपीएस’ : जीपीएस अर्थात ग्लोबल पोझिशन सिस्टिम ही टँकरवर लावल्यास तो टँकर कुठे आहे, याची माहिती अवगत होईल. टँकर कुठे कुठे गेला, याची माहिती मिळेल. टँकरने पाणी भरल्यानंतर तो कुठल्या गावात गेला, याची अद्ययावत माहिती मिळेल. तसेच या टँकरने संबंधित गावात किती वाजता किती फेर्‍या मारल्या, याची माहिती आपोआप तयार होईल.

पाण्याचा ‘व्यापार’ रोखण्यासाठी शासनाचा ‘उपाय’
जीपीएस टँकरवर लावावे लागेल. पण, यावरही चोरट्यांची शक्कल आहे. त्यामुळे वन टू का फोर करताना तो फोर टू का वन करण्याची शक्कल चोरट्यांची आहे. टँकरवर जीपीएस न लावता तो टू व्हीलर असलेल्या लुनावर काय सायकलवरसुद्धा लावता येईल. ही सायकल गावोगावी फिरवण्याची शक्कल चोरटे करू शकतात. त्यामुळे गावकर्‍यांना अशा टू व्हीलरवर लक्ष ठेवत त्यांना पाणी पाजावे लागेल. अन्यथा, गावकर्‍यांची तहान कायम राहील.