आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी वाचवा, अन्यथा पुढील वर्षी संकट; बाष्पीभवनात उडणार पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- प्रत्येक नागरिकाने यंदा उन्हाळ्यात पाण्याची बचत केली नाही आणि पावसाने दांडी मारली, तर पुढील वर्षी पाणीटंचाईचे चटके शहराला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात महापालिका जलप्रदाय विभागाचे पाणीपुरवठय़ाचे नियोजन कोसळले आहे. प्रशासनाची कुठलीही मान्यता न घेता सत्तापक्षाने यंदा 17 फेब्रुवारी रोजी अमलात आणलेले पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक अधिकार्‍यांनी पूर्णत: बदलले आहे.

जलप्रदाय विभागाने अस्तित्वात असलेल्या तीन झोनचे चार झोन करत आता आठ दिवसांत दोनवेळ पाणीपुरवठा, असे नवे अलिखित नियोजन केले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईच्या कृत्रिम टंचाईस समोर जावे लागत आहे. आज महान येथे दोन तास विद्युतपुरवठा खंडित असल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठय़ावर झाला.

याविषयी महापालिका जलप्रदाय विभागाचे प्रमुख नंदलाल मेर्शाम यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर नंदलाल मेर्शाम यांनी अधिक अधिकार्‍यांची गरज असल्याचे सांगितले.

अस्तित्वात आला नवा झोन : अकोटफैल व जुने शहरातील काही शेवटच्या भागांमध्ये पाणीपुरवठा होत नव्हता, म्हणून महापालिकेतील अधिकार्‍यांनी त्यांच्या सोयीसाठी महानगरात चौथा झोन निर्माण केला. या माध्यमातून रविवारी देखभाल व दुरुस्तीच्या वेळेत आता या पाणी पुरवठा न होणार्‍या भागांमध्ये पाणी पुरवठा होणार आहे. सहा दिवसांत दोनवेळ होणारा पाणीपुरवठा आता आठ दिवसांत होणार आहे.

शहराला काटेपूर्णा प्रकल्प अर्थात महान येथून पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पात बुधवारी 31 दलघमी (36 टक्के) इतके पाणी आहे. पण, वाढते तापमान पाहता दर महिन्याला दोन दलघमी पाण्याची वाफ होण्याची भीती आहे. शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी दोन दलघमी पाणी दरमहिन्याला लागते. अशा प्रकारे महिन्याला चार दलघमी पाणी लागते. चार महिन्यांत 16 दलघमी पाणी लागेल. तोपर्यंत पाऊस पडला नाही आणि पाटबंधारे विभागाने सिंचनासाठी जुलैत पाणीपुरवठा केल्यास अडचण निर्माण होईल. अशा परिस्थितीत पुढील वर्षासाठी 15 दलघमी पेक्षा कमी जलसाठा शिल्लक राहील. हा जलसाठा पुढील वर्षाच्या नियोजनाच्या दृष्टीने अल्प ठरणार आहे. कर वसुली, पाणी पुरवठय़ाचे नियोजन कोसळले आहे. मनपा पाणी पुरवठा विभागाने प्रशासनाची मान्यता न घेता व सत्तारुढ महाआघाडीने अकोला महापालिकेचे पाणी पुरवठय़ाचे नियोजन कोसळले आहे. आठवड्यातून दोनदा होणारा पाणी पुरवठा आता अनियमित झाला आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे हे संकट कोसळले आहे. याचे नियोजन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले नाही, तर शहरातील अनेक प्रभागांत हातपंप व सबर्मसिबल पंप सुरू नसल्याने नागरिकांची मोठी अडचण होत आहे.

हँड पंपाद्वारे दाखवतात ‘हात’
बार्शिटाकळी तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा प्रकल्पात मुबलक जलसाठा आहे. मात्र, असे असतानाही काही कारण समोर करून मोठय़ा प्रमाणात हँडपंप नादुरुस्त आहे, अशी ओरड होत आहे. यात काही लोकप्रतिनिधीतर्फे ‘हात’ दाखवण्याचा उद्योग सुरू आहे. हँडपंप दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेची मोठी आर्थिक फसवणूक होत आहे, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान शहरात 2,750 हँडपंप आहेत ते सुरूआहे की बंद, याची तपासणी करण्याची गरज आहे, तर सबर्मसिबल पंपांसाठी किती विजेचे देयक महापालिका देते, याची चाचपणी होण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
शहरात पावसाच्या जोरदार सरी
वैषाख वणव्यात सूर्य आग ओकत असताना बुधवार, 30 एप्रिलला शहरात पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या सरींमुळे काही काळ वातावरणात गारवा पसरला. मात्र, नंतर उष्णतेसोबतच दमटपणा वाढला. पावसाळी वातावरण नसताना झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. पावसापासून बचावासाठी रस्त्यांवर ये-जा करणार्‍यांनी मिळेल त्या ठिकाणी आडोसा घेतला. दरम्यान शहरात काही भागात पाऊस तर काही भागात कडक उन असा उनपावसाचा खेळ अकोलेकरांनी अनुभवला पाऊस सुरू असताना शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.पाऊस थांबल्यानंतर वातावरणात दमटपणा वाढल्याने अकोलेकर त्रस्त झाले.