यवतमाळ - गतवर्षी पावसाने जिल्ह्यावासीयांना दिलासा दिला होता. यंदा मात्र मृगनक्षत्र संपले, तरीसुद्धा पाण्याचा थेंब मिळेनासा झाला आहे. नदी, नाले, तलाव आटून गेलेले असताना अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील जवळपास 141 गावातील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात सर्वांधिक म्हणजे 35 विहिरी उमरखेड तालुक्यात अधिग्रहीत करण्यात आल्या असून, 12 गावात टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे. आठवड्याभरात पावसाचे आगमन झाले नाही तर यापेक्षा भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
यंदा पावसाचे प्रमाण सरासरी राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळा अत्यंत कठीण जातो. यंदाही हीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी जवळपास 4 कोटी 30 लाखांचा पाणी टंचाईचा कृती आराखडा मंजूर केला होता. त्यातील बरीचशी कामे हाती घेण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने विंधन विहिरीचे प्रस्ताव बोलावण्यात आले होते. जवळपास 47 प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले. यातून 27 कामांना मंजुरात देवून कामाची सुरुवातसुद्धा करण्यात आली आहे. तात्पुरती पूरक नळयोजना, नळ योजनांची विशेष दुरूस्ती, विंधन विहिरी दुरूस्ती, गाळ काढणे, विहीर खोल करणे, बुडक्या, झिरे घेणे, टँकरव्दारे पाणी पुरवठा करणे आणि खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे इत्यादी कामांसाठी 4 कोटी 29 लाखांचा टंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला होता.
त्याप्रमाणे पाणी पुरवठा विभागाने काम सुरू केले आहे. तरीसुद्धा जिल्ह्यातील बारा गावात आजही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये भीमकुंड, सुधाकरनगर, कारोड, मारवाडी (खु.), म्हैसमाळ, अनसिंग, उल्हासवाडी, बोथावन, चिकनी डोमगा, अंजनी, भांबराजा, लोहाºयातील वॉर्ड क्रमांक तीन आणि चारमध्ये टँकरव्दारे पाणी पुरवठा करणे सुरूच आहे.
मृग नक्षत्र संपून पाच दिवसांचा कालावधी लोटला आहे. बळीराजासह सर्वसामान्य जनता आता पावसाची वाट पाहत आहे. मात्र, वरूणराजा प्रसन्न होतच नाही. त्यात जवळपास 141 गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी 141 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सर्वांधिक विहिरी उमरखेड तालुक्यात 35 अधिग्रहीत करण्यात आल्या असून, घाटंजी 27 आणि यवतमाळात 23 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. आता पाण्यासाठी भटकंतीशिवाय दुसरा पर्याय नाही.
26 बोअरसाठी दिला निधी
पाणी टंचाई पाहून पूर्वीच्या 26 बोअरसाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील गटविकास अधिकाºयांना सुचना देण्यात आल्या आहेत. ही कामेसुद्धा यंदा पार पडणार आहेत. आमदार निधीतील 119 कामापैकी 85 कामे पूर्ण झाली असून, 12 बोअर फेल गेले आहेत. एकंदरीत पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याच्या उद्देशाने पाणी पुरवठा विभागाकडून निधी देण्यात आला होता, अशी माहिती अध्यक्षांनी दिली.
19 गावांचा करारनामा होईना
विशेष नळ योजना दुरूस्तीसाठी प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने 68 प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले. यातील 42 कामांना मंजुरी मिळाली आणि संपूर्ण कामे ग्रामपंचायतीलाच करावी लागणार होती. परंतु यातील केवळ 23 गावांनी करारनामा करून कामांना सुरुवात केली. तर उर्वरीत 19 गावांनी अद्याप करारनामाच केला नाही. त्यामुळे त्या कामांना अद्याप मुहूर्तच मिळालेले नाही. दरम्यान, 23 जून रोजी राळेगाव तालुक्यातील मंगी ग्रामपंचायतीने करारनामा करून घेतला हे विशेष.