आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवलेंना काय हवे ते आम्हाला चांगलेच ठाऊक आहे, विनोद तावडे यांचे वक्तव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ‘लोकसभा निवडणुकीसाठी रिपाइं नेते रामदास आठवले हे वेगवेगळ्या मतदारसंघांवर दावा करीत आहेत त्यात काही चूक नाही, आठवलेंना नेमके काय हवे ते आम्हाला चांगले ठाऊक आहे आणि आम्ही ते आठवलेंना देऊ,’ असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व भाजप नेते विनोद तावडे यांनी केले.

तावडे यांनी शुक्रवारी अकोला येथील दैनिक ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संपादकीय सहकार्‍यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी आठवलेंच्या दाव्यावर ही प्रतिक्रिया दिली. यासोबतच त्यांनी राज्यातील विविध मुद्दय़ांवर विचार मांडले आणि शासनावरही टीका केली.

राज्यात गुन्हेगारांचा प्रभाव वाढत आहे. राजकारणातही गुन्हेगारीचा प्रभाव वाढत असून सत्ता आणि पैशांच्या मोहामुळे राजकारणात गुन्हेगारांचा शिरकाव होत आहे. गुन्हेगारांना राजकारणात आणण्यामागे सत्ताधार्‍यांचाही मोठा वाटा आहे. 1992 सारखी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्या वेळी राजकारणात मोठय़ा प्रमाणात गुन्हेगारी वाढली होती, त्यावर वेळीच उपाययोजना करत युती सरकारने ती संपुष्टात आणली होती. पुढील निवडणुकीत राजकारणातील गुन्हेगारीचा मुद्दा महत्त्वपूर्ण राहणार असल्याचे ते म्हणाले.

नव्या सीलिंगमुळे सत्यानाश
नव्या सीलिंग कायद्यामुळे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे सत्यानाश होणार आहे. या कायद्यामुळे विदर्भातील शेतकर्‍यांचे सर्वाधिक नुकसान होईल. त्यामुळे सीलिंग कायद्याला भाजपचा विरोध राहील. भाजप हा कायदा कधीही होऊ देणार नाही, असे तावडे यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवानंतर जागावाटप
लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांत सुरू झाली आहे. राज्यातील 48 मतदारसंघातील जागावाटपावर महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. महायुतीचे अंतिम जागावाटप गणेशोत्सवानंतर होईल, अशी माहिती त्यांनी दिली.


आबांची ‘तोंडपाटीलकी’
गृहमंत्री पाटील यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे नेते टीका करीत आहेत, या विषयी विचारले असता, तावडे म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार, अहमद पटेल हे गृहविभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करतात. त्यामुळे हे अधिकारी आर. आर. पाटील यांचे ऐकतसुद्धा नाहीत. राज्याचे गृहमंत्री साहेबांच्या आदेशानुसार ‘तोंडपाटीलकी’ करण्यातच धन्यता मानत असल्याची टीका त्यांनी आबांवर केली.