आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात ट्रॉन्सेक्ट लाइनने होणार वन्यप्राणी प्रगणना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अभयारण्य, राखीव वनक्षेत्रातील वाघ तसेच इतर मांसभक्षी प्राण्यांचे अस्तित्व, वावर व संख्येबाबत अंदाज, तृणभक्षी प्राण्यांची विपुलता, अधिवास क्षेत्राची गुणवत्ता तसेच वन्यजीव क्षेत्रात मानवी हस्तक्षेप आदींची आकडेवारी उपलब्ध करण्यासाठी येत्या १५ ते २३ जानेवारीदरम्यान राज्यात ट्रॉन्सेक्ट लाइन पद्धतीने वन्यप्राणी प्रगणना करण्यात येत आहे.
अकोला वन्यजीव विभागाच्या अखत्यारीत काटेपूर्णा व ज्ञानगंगा असे दोन अभयारण्य असून, त्याखेरीज संरक्षित वनक्षेत्राचाही भाग जिल्ह्यात आहे. या दोन्ही अभयारण्यांमध्ये ट्रॉन्सेक्ट लाइन पद्धतीने वन्यप्राणी प्रगणना करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व गार्ड, फॉरेस्टर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सहायक उपवनसंरक्षक, उपवनसंरक्षक आदी कामाला लागले आहेत. व्याघ्र संनियंत्रणाच्या पद्धतीमध्ये आपल्या नियत क्षेत्रात मांसभक्षी प्राण्यांच्या खाणाखुणांची नोंद घेणे, लाइन ट्रॉन्सेक्टवरील वनस्पती, झाडोरा आच्छादन यांचा अभ्यास करणे, भूपृष्ठावरील आच्छादनाचा तसेच तृणभक्षी (खुरवर्गीय व इतर) प्राण्यांच्या विष्ठेचा, लेंड्यांचा अभ्यास करून नोंदी घेणे ही या पद्धतीमधील मूळ संकल्पना आहे. सदर पद्धतीत सर्व नियत क्षेत्रांची माहिती एकत्रित करून त्यांचे संगणकाद्वारे विश्लेषण करून व टप्पा ३ व ४ मध्ये त्या माहितीचा तज्ज्ञांकडून पुन्हा वापर करण्यात येऊन तपासणी करण्यात येणार आहे.
संगणकाधारित मॉडेलिंगसाठी योग्य माहितीच उपलब्ध होणे आवश्यक असल्याने सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना त्याविषयी प्रशिक्षण देण्यात येत आहे.

काय आहे ट्रॉन्सेक्ट लाइन
प्रादेशिक, वन्यजीव तथा वनविकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वनांमध्ये नियत क्षेत्र (बीट) हे घटक म्हणून या पद्धतीने आठ दिवसात प्रगणना करावयाची आहे. यामध्ये प्रपत्र १ मध्ये वाघ, बिबटा व इतर मांसभक्षी प्राण्यांच्या अस्तित्वाच्या खाणाखुणांची नोंद घेतात. प्रपत्र २ मध्ये लाइन ट्रान्सेक्टवर तृणभक्षी प्राण्यांची नोंद घेण्यात येते, तर प्रपत्र ३ अ, ब व क मध्ये वनस्पतींची तसेच मानवी हस्तक्षेपांची नोंद घ्यावयाची असते. प्रपत्र ४ मध्ये तृणभक्षी प्राण्यांच्या विष्ठेची, लेंड्यांची नोंद घेतात तर राज्यातील गिधाडांच्या अस्तित्वाविषयी जाणून घेण्यासाठी प्रपत्र ५ मध्ये त्यांचे सर्वेक्षण नोंदवायचे आहे.
प्रगणना पहिले दोन दिवस
संपूर्ण आठ दिवसांच्या या कार्यक्रमात पहिले दोन दिवस पूर्वतयारी करण्यात येते. यामध्ये वनरक्षक नियत क्षेत्रातील वनाचा प्रकार, भूप्रदेशाचा प्रकार, झाडोरा, अधिवास यांचा अभ्यास करण्यात येतो तसेच आवश्यकतेनुसार दोन किलोमीटरची ट्रॉन्सेक्ट लाइन टाकण्यात येते. दोन वेगळ्या अधिवासांसाठी जसे सागवान वने आणि मिश्र वने यांच्यासाठी वेगवेगळ्या लाइन टाकण्यात येतात. प्रत्येक ४०० मीटर अंतरावर म्हणजे ४००, ८००, १२००, १६०० व २००० मीटर लाइनवर खुणा करून त्यांचे जीपीएसच्या साहाय्याने अक्षांश, रेखांश घेण्यात येतात.
तारखेची नोंद होणार
त्यानंतर पुढील तीन दिवस नियत क्षेत्रातील वाघ, बिबट व इतर मांसभक्षी प्राण्यांच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा नोंदवण्यात येतात. यामध्ये निरीक्षणाची वेळ, सुरुवातीचे अक्षांश, रेखांश, तारीख नोंदवण्यात येते.
दिवस सहा, सात व आठ : या अखेरच्या तीन दिवसात लाइन ट्रॉन्सेक्टवर प्रत्येक ४०० मीटरवर खूण करून त्या ठिकाणी वनस्पती सर्वेक्षण (१५ मीटर त्रिज्येच्या वर्तुळ खंडात), मानवी हस्तक्षेप, भूआच्छादन (१ मीटर त्रिज्येचे वर्तुळ), तृणभक्षी प्राण्यांची विष्ठा (२ बाय २० आयातखंड) यांची नोंद दररोज सकाळी घेण्यात येते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
काटेपूर्णा, ज्ञानगंगा अभयारण्यात तयारी : ट्रॉन्सेक्ट लाइन पद्धतीने वन्यप्राणी प्रगणनेसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून, सर्व प्रपत्रांमध्ये नोंदी कशा घ्याव्यात, याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. ट्रान्सेक्ट लाइनची तपासणी, बीट नकाशा, कंपास, नायलॉन दोरी, कागदी पिशव्या आदी साहित्यांची जुळवाजुळव करण्यात आली आहे.