आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधीक्षक कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जुने शहरातील गुलजारपुर्‍यातील सशस्त्र हाणामारीत नगरसेवक अजय रामटेकेसह इतरही निरपराध युवकांना गोवल्याचा दावा करत आरोपींच्या सुटकेसाठी मंगळवार, 8 ऑक्टोबरला पोलिस अधीक्षक कार्यालयावर महिलांच्या मोर्चाने धडक दिली. कचरा उचलण्यावरून दोन गटात सशस्त्र हाणामारीची घटना सोमवार, 7 ऑक्टोबरला घडली होती. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. मात्र, हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या युवकांनाच पोलिसांनी गोवल्याचा आरोप करत 100 ते 125 महिलांनी पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी मोर्चेकरी महिलांनी पोलिस अधीक्षकांना मागणीचे निवेदन सादर केले.

मोर्चेकरी, पोलिस आमने-सामने
महिलांच्या मोर्चाला पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर अडवले. जुने शहरचे ठाणेदार नंदकिशोर शर्मा यांनी महिलांशी संवाद साधला. गुन्ह्यातील निरपराध आरोपींना सोडावे, अशी मागणी महिलांनी केली. मात्र, ठाणेदार शर्मा यांनी तपास करूनच आरोपींना वगळण्याचा निर्णय घेऊ, असे सांगितले; परंतु महिलांनी आपली मागणी रेटून धरली. त्यामुळे शर्मा यांनी आजच परिसरातील नागरिकांचे जबाब नोंदवू आणि त्यानंतर आरोपींना वगळण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

सात आरोपी गजाआड
गुलजारपुरा प्रकरणातील हाणामारीप्रकरणी पोलिसांनी दंगल, जबर मारहाणीचे गुन्हे दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी मुकेश बागडे, राजू बगाडे, अनिरुद्ध वैद्य, हरीश धुमोने, सचिन प्रजापती यांना अटक केली. त्यांची 11 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे तसेच पोलिसांनी 8 ऑक्टोबरला जखमी अनिल मेसरे, संतोष कोल्हे यांना अटक केली.

तगडा पोलिस बंदोबस्त
पोलिस अधीक्षक कार्यालयाबाबहेर एकीकडे महिलांचा मोर्चा धडकला असताना दुसरीकडे आतमध्ये गुन्हे शोध परिषद (क्राइम मीटिंग) सुरू होती. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. बंदोबस्तामध्ये ठाणेदार नंदकिशोर शर्मा, ठाणेदार जे. बी. गायकवाड, र्शी. दिवेकर, अँटी गुंडा स्कॉडसह क्युआरटीची तुकडी तैनात होती.