आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच पक्षांनी महिलांना झिडकारले, काँग्रेसतर्फे उषा विरक, सहा महिलांनी घेतला हाती बंडखोरीचा झेंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महिलांनास्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण देण्याचा टेंभा मिरवणाऱ्या राजकीय पक्षांनी प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीत महिला कार्यकर्त्यांना डावलले आहे.
जिल्ह्यातील पाचपैकी अकोला पश्चिम वगळता एकाही मतदारसंघात कोणत्याही पक्षाने महिलांना संधी दिलेली नाही. अकोला पश्चिममधून काँग्रेसने उषा विरक यांना उमेदवारी दिली, तर अनेक महिला कार्यकर्त्यांनी पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर बंडाचा झेंडा हाती घेत उमेदवारी दाखल केली आहे. हा झेंडा ताठ मानेने फडकणार की, खाली उतरवला जाणार ही बाब लवकरच स्पष्ट होईल. जिल्ह्याच्या पाचही मतदारसंघांतून १९९ उमेदवार रिंगणात उतरले आहे. यात फक्त सात महिला मैदानात अाहे. अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेसकडून उषा विरक रिंगणात उतरल्या आहेत. अकोला पूर्व मतदारसंघात पुष्पाताई इंगळे यांनी भारिप-बमसंकडून अर्ज भरला असला, तरी अधिकृत उमेदवारी मात्र हरिदास भदे यांना देण्यात आली आहे. हीच स्थिती इतरही मतदारसंघांत पाहायला मिळते. अकोट मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे ज्योती कुकडे या इच्छुक होत्या. परंतु, पक्षाने राजीव बोचे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सध्या तरी ज्योती कुकडे दंड ठोठावत तूर्तास पक्षाकडून उमेदवारी दाखल केली आहे. परंतु, त्यांना अाता एबी फॉर्म मिळेल, असे वाटत नाही. बाळापूर मतदारसंघात भाजपकडून सर्वाधिक इच्छुक होते. यात महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. परंतु, भाजपने तेजराव थोरात यांना उमेदवारी बहाल केली. त्यामुळे वर्षा बागडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली आहे. तसेच शिवसेनेतर्फे अकोला पूर्वसाठी चर्चेत असलेल्या ज्योत्स्ना चोरे यांनी बाळापूरमधून उमेदवारी दाखल केली. परंतु, सेनेने कालीन लांडे यांना मैदानात उतरवले आहे. मूर्तिजापूरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. सुधीर विल्हेकर अधिकृतपणे असले, तरी मंगला सोनोवणे यांनी पक्षातर्फे अर्ज दाखल केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यकर्त्या प्रतिभा अवचार अपक्ष उतरल्या आहेत. जिल्ह्यातील परिस्थिती पाहता पक्षांनी महिलांना दुय्यम दर्जा देत दुर्लक्ष केले आहे.
काही महिला अपक्ष : राजकीयपक्षांनी महिलांना उमेदवारी देताना नगण्य महत्त्व दिले. परंतु, काही महिलांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. १९९० ला सात महिला, १९९५ ला सात महिला, २००४ ला एक, २००९ ला एक महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली.
१९९९ निरंक : १९९९च्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी महिला कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवली, तर एकाही महिला कार्यकर्त्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. ही निवडणूक महिला उमेदवारांसाठी निरंक ठरली.
प्रथमच बंडखोरी : उमेदवारीअर्ज परत घेण्याची संधी अद्याप कायम आहे. त्यामुळे बंडखोरी झाली असे पूर्णत: म्हणता येणार नाही. हे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच स्पष्ट होईल. परंतु, पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची हिंमत या वेळी महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात दाखवली आहे.
राजकीय पक्षांनी दिलेल्या महिला उमेदवार
मतदारसंघ वर्ष पक्ष उमेदवाराचे नाव
अकोला१९७८ जनता पक्ष प्रमिला जैन
अकोला १९८० भाजप प्रमिला टोपले
अकोला १९८५ भाजप प्रमिला टोपले
मूर्तिजापूर २००४ रिपाइं वंदना वासनिक
मूर्तिजापूर २००९ राष्ट्रवादी प्रतिभा अवचार
बाळापूर २००९ काँग्रेस रजिया बेगम खतीब