आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरितालिका दिन विशेष : हरितालिका पूजेने प्राप्त होते वर्षभराच्या उपासनेचे फळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, तर युवती चांगला वर मिळावा यासाठी हरितालिकेची पूजा करतात. हरितालिका म्हणजे उमा महेश्वराची पूजा. माता पार्वतीने महादेवासाठी ही पूजा केली होती. तेव्हापासून तरुणी, सौभाग्यवती भाद्रपद शुद्ध तृतीयेला ही पूजा करतात. वर्षभर सोमवार आणि महाशिवरात्री या दिवशी भगवान शंकराची पूजा जरी शक्य नसली, तर हरितालिकेला पूजा केल्यास बारा महिन्यांच्या उपासनेचे फळ प्राप्त होते.
महिला कुळाचारानुसार घरी ही पूजा करतात. घरातील सर्व महिला, मैत्रिणी एकत्र येऊन एका ठिकाणी पूजा मांडतात. सकाळी नदीवर जाऊन तेथील वाळू आणली जाते. या वाळूपासून शिवलिंग तयार केले जाते. शिवलिंगाला दूध, पाणी यांचा अभिषेक करून हळद, कुंकू, गुलाल, अष्टगंध चंदन वाहून पूजा केली जाते. त्यानंतर बेल आणि विविध वनस्पती वाहण्यात येतात. यात औदुंबर, पिंपळ, पळस, आघाडा, केना, दुर्वा यांच्यासोबत अनेक फुलांच्या फळांच्या वनस्पती वाहिल्या जातात. फळांमध्ये धोत्र्याच्या फुलाला विशेष मान आहे. फुलांमध्ये पांढऱ्या रंगाचे पुष्प भगवान शंकरांना अति प्रिय असते. यानंतर हरितालिकेची कथा वाचली जाते आणि हरितालिका, शंकराची आरती होते तसेच रात्री जागरण केले जाते.
फक्त पतीला दीर्घायुष्य लाभावे किंवा उत्तम वर मिळावा यासाठी ही पूजा होत नाही. भगवान शंकर म्हणजे साम सदाशिव आहेत. त्यांची आराधना म्हणजे सर्व सुख, शांती, समाधानाची प्राप्ती. शिवाय मुलांमध्ये चांगले विचार, चांगले आचरण करण्याची वृत्ती निर्माण व्हावी यासाठीदेखील शंकराकडे साकडे घातले जाते. सर्व महिला एकत्र येऊन भगवानाची पूजा अर्चा करतात. भजनांच्या माध्यमातून त्यांच्या रूपाचे वर्णन करतात तसेच रात्री जागरण करून शिवाची आराधना करतात.