आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Law Campaign Issue At Akola, Divya Marathi

महिलांचे कायदे समजण्यापेक्षा उमगणे आवश्यक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महिलांवर होत असलेला अन्याय, त्यांची समाजातील स्थिती सुधारण्यासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले आहेत. परंतु, कायदे फक्त समजून घेण्यापेक्षा ते उमगणे आवश्यक आहे, असे मत अँड. शारदा सोनकर यांनी व्यक्त केले. आंबेडकरनगर येथील बुद्ध विहारात सुरू असलेल्या सहा दिवसीय नि:शुल्क नेतृत्व विकास कार्यशाळेत 25 मे रोजी त्या बोलत होत्या.

नई रोशनी योजनेंतर्गत अल्पसंख्याक मंत्रालय दिल्ली, जिल्हाधिकारी कार्यालय आणि दिव्यज्ञान महिला बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने अल्पसंख्याक तरुणींसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अँड. शारदा सोनकर यांनी तरुणींना महिलांसाठी असलेले कायदे, योजना यांची माहिती दिली. एखाद्या ठिकाणी आपण राहतो, काम करतो त्या वेळी समस्यांना तोंड द्यावे लागते. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना कायद्याचे ज्ञान असणेदेखील महत्त्वाचे आहे. समाजातील आपली स्थिती, स्थान, समस्या यानुसार कायदे झाले. पण, त्याला पळवाटाही तेवढय़ाच निर्माण झाल्या. त्यामुळे महिलांसमोर दुसरी समस्या निर्माण झाली. हे चक्र समजले तर आपण योग्य मार्ग काढू शकतो, असे त्या म्हणाल्या.

प्रथम सत्रातील माहितीचे तरुणींना किती आकलन झाले हे जाणून घेण्यासाठी त्यांना प्रात्यक्षिक करायला सांगितले. त्यानुसार तरुणींनी चर्चेतून चार्ट तयार केले आणि त्याचे सादरीकरण केले. यापूर्वी प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण घेतलेल्या मीनाक्षी मुंडे यांनी अनुभव कथन केले. या वेळी ज्ञानेश्वरी इंगळे, प्रतिभा काटे, सुनीता फोकमारे, कुसुम ठाकरे, राजेश्वरी गावंडे, मालाताई जवंजाळ, गौरी काटे, साहेबराव इंगळे गुरुजी आदी उपस्थित होते.