आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने दिला मजनूला चोप; अकोला बसस्थानक परिसरातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील चहा कॅँटीन. उन्हाने अंगाची लाहीलाही होत असल्याने एक ४५ वर्षीय महिला पाण्याची बॉटल घेण्यासाठी आली. त्याच लगबगीने तिच्यापाठोपाठ एक २५ वर्षांचा युवकसुद्धा आला. महिला पाण्याची बॉटल घेण्यासाठी उभी होती. तो तरुणही तिच्यामागे उभा राहिला.
काही कळायच्या आत महिलेने विद्युतगतीने रौद्ररूप धारण करून त्या मजनूच्या श्रीमुखात मारायला सुरुवात केली. अचानक काय झाले म्हणून कँटीनच्या मालकासह ग्राहकसुद्धा अचंबित झाले. शिवाय फलाटावर बसची वाट पाहत बसलेल्या प्रवाशांनीही कँटीनपुढे गर्दी केली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून त्या मजनूने तेथून पळ काढला. ही घटना बुधवार, २२ एप्रिलला दुपारी वाजताच्या सुमारास घडली.
येथील बसस्थानकावर रोजच्या प्रमाणेच बुधवारी दुपारी गर्दी होती. एका बसमधून एक मध्यमवयीन महिला उतरली. तिच्यापाठोपाठ एक २५ वर्षांचा युवकसुद्धा उतरला. प्रवासामुळे प्रचंड थकवा आल्याने ती काही वेळ फलाटावरील बाकड्यावर बसली. तिच्या बाजूलाच तो युवकही बसला.
महिला पदराने चेहऱ्यावरचा घाम पुसत असताना तो युवक वासनांध नजरेने तिच्याकडे पाहत होता. त्यामुळे त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी ती कँटीनमध्ये गेली. तिच्यापाठोपाठ तो युवकसुद्धा आला. महिलेने कँटीन मालकाकडे पाण्याची बॉटल मागितली. त्या वेळी तो युवक तिच्या मागे चूपचाप उभा होता. त्याच्या मनातला कावा तिने हेरून त्याच्याकडे मोर्चा वळवत त्याला चांगलाच चोप दिला. शिवाय ‘तुझ्या एवढा आपल्याला मुलगा आहे, चिडीमारी करायला लाज वाटत नाही का?’ असा उपदेशही केला. तिचे रौद्ररूप आणि भोवताली जमलेली गर्दी पाहून मजनूने तेथून पळ काढला. बुधवारी दिवसभर याच घटनेची चर्चा बसस्थानक परिसरात रंगली होती. मात्र, या प्रकरणी संबंधित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे टाळले. जिल्हा पोलिस दलाने महिलांच्या तक्रार निवारणासाठी येथे दिवसा महिला पोलिस शिपायाची ड्युटी लावावी, अशी मागणीही होत आहे.

महिला पोलिसांची ड्युटी हवी

सध्यालग्नसराईचे दिवस असल्याने बसस्थानकावर गर्दी वाढली आहे. दरम्यान, या ठिकाणी एका पोलिस शिपायाची २४ तास ड्युटी असते. पण, प्रवाशांची आणि गाड्यांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी दोन पोलिस कर्मचारी असणे आवश्यक आहे. शिवाय जिल्हा पोलिस दलाने महिलांच्या तक्रार निवारणासाठी येथे दिवसा एका महिला पोलिस शिपायाची ड्युटी लावावी, अशी मागणीही होत आहे.