आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाआधीपासून मुलींनी घ्यावी आरोग्याची काळजी, डॉ. मीनाक्षी मोरे यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांमधील आजारांचे प्रमाण वाढत आहे. नोकरी घर सांभाळण्याच्या कसरतीत आरोग्याच्या बाबतीत मात्र हलगर्जीपणा होतो. लग्नानंतर गरोदरपणात काळजी घेऊ, असे म्हणून आज आपण दुर्लक्ष करतो हेच चुकते. गरोदरपणात जशी काळजी घेणे आवश्यक असते, तसेच आतापासून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. भविष्यातील उत्तम आरोग्यासाठी युवतींनी आजपासूनच आरोग्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मीनाक्षी मोरे यांनी केले. शिवाजी महाविद्यालयात ११ फेब्रुवारी रोजी महिला सक्षमीकरण कार्यशाळेत त्यांनी गर्भसंस्कार याविषयी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयातील गृहविज्ञान विभाग, गृह अर्थशास्त्र विभाग, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युवतींसाठी सात दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. मोरे यांनी "गर्भसंस्कार, युवतींनी घ्यावयाची काळजी', याविषयी माहिती दिली. मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे, ते तल्लख व्हावेत म्हणून आपण बाळ गर्भात असतानाच त्याच्यावर संस्कार करतो. हे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच आईचे आरोग्यही आवश्यक आहे. आजच्या युवती करिअरच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तसेच अनेक वेळा चुकीचे निर्णय घेतले जातात. याचा परिणाम मुलींच्या आरोग्यावर होतो परिणामी तो बाळावर होतो. बदलती जीवनशैली, सवयी यामुळे आज सिझरिंग होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच तरुण वयात केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम भविष्यात बाळावर झालेला दिसतो. त्यामुळे युवतींनी आतापासूनच आरोग्याची, आहाराची काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
त्यांनी अनेक छोटे-
छोटे उदाहरण देऊन मातृत्वाचे महत्त्व पटवून सांगितले. तसेच गर्भसंस्कार म्हणजे पोषक आहारासोबतच व्यायाम, चांगले वाचन आणि उत्तम संगीताचा परिणाम याविषयी माहिती दिली. डॉ. रेखा लांडे यांनी प्रास्ताविकात सात दिवसीय कार्यशाळेमागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोनाली मालोकार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. ज्योती मानकर यांनी केले. या वेळी डॉ. प्रतीक्षा कोकाटे, डॉ. नीलिमा टिंगरे, प्रा. जयश्री कातरे आदी उपस्थित होत्या. गृहविज्ञान विभाग, गृह अर्थशास्त्र विभाग, आरोग्य विभाग यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
आरोग्याविषयी माहिती
कार्यशाळेच्यापहिल्या दिवशी, १० फेब्रुवारी रोजी डॉ. सीमा तायडे यांनी आरोग्याविषयी जनजागृती केली. मुळात सुदृढ आरोग्य म्हणजे काय हेच जर माहीत नसेल तर आरोग्याची काळजी कशी घेणार, हा प्रश्न असतो. त्यामुळे युवतींना आरोग्याच्या बाबतीत सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.