आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा कर्मचाऱ्यांचा संप मिटला, थकित वेतन देण्यास प्रशासन राजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेतील कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे वेतन, तीन महिन्यांची पेन्शन तसेच सफाई कामगार, तृतीय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगाची थकित देण्याचे प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर यांनी मान्य केले. आमदार गोपीकिशन बाजोरिया, महापौर उज्ज्वलाताई देशमुख, उपमहापौर विनोद मापारी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम यांनी संप मिटण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे मार्ग निघाला.

मनपा कर्मचाऱ्यांच्या लांबत चाललेल्या संपाबाबत दिवेकर यांच्या दालनात बुधवारी सायंकाळी चर्चा केली. मनपा कर्मचारी संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. शिष्टाई यशस्वी झाली आणि कर्मचाऱ्यांसोबतच उपस्थितांनी सुटकेचा श्वास घेतला. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्याचे थकित वेतन, निवृत्तिवेतन दिले जाणार आहे. शिक्षकांना दोन महिन्यांचे थकित वेतन तसेच सफाई कामगार, तृतीय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगाची थकबाकी द्यावी, असा आग्रह आमदार बाजोरिया यांनी दिवेकर यांच्याकडे धरला. संघर्ष समितीचे नेते पी. बी. भातकुले, अनिल बिडवे, अनुप खरारे, बी. जी. डोंगरे यांच्यासह अन्य नेत्यांना ही बाब पटवून देण्यात आली. भविष्य निर्वाह निधी आणि अन्य रकमेवरून वाद झाला. परंतु, तो मिटवण्यात आला. त्यामुळे संप मागे घेण्यात आला. २३ जानेवारीपासून संप सुरू असल्याने महापालिकेचे कामकाज खोळंबले होते. बुधवारी दुपारी तर संघर्ष समितीने उद्यापासून अत्यावश्यक सेवा खंडित करण्याची नोटीस देण्याची तयारी चालवली होती. परंतु, ती वेळ आली नाही.

चर्चेदरम्यान पाचव्या वेतन आयोगाच्या थकबाकीवरून अडसर होत होता. परंतु, तोडगा निघाला. मनपाकडे असलेल्या १७ कोटीतून वेतन दिले जाईल आणि कोणार्ककडून जे कोटी रुपये मनपाला प्राप्त होतील त्यातून आणि मनपाकडील दीड कोटी अशा साडेचार कोटी रुपयांतून पाचव्या वेतन आयोगाची रक्कम येत्या काळात अदा केली जाईल, याविषयी एकमत झाले. उर्वरित वेतनाची समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही प्रभारी आयुक्त दिवेकर यांनी दिली. प्रशासकीय अडथळ्यांमुळे कर्मचाऱ्यांचे प्रश्न खोळंबणार नाहीत याकडे लक्ष द्यावे, असेही दिवेकर यांनी निर्देश दिले. नगरसेविका मंजूषा शेळके, देवश्री ठाकरे, शरद तुरकर, सोनू देशमुख, योगेश अग्रवाल हेही उपस्थित होते. अनिल बिडवे, पी. बी. भातकुले यांनी वेतनाबाबत तोडगा निघाल्याची वार्ता मनपात येऊन कर्मचाऱ्यांना दिली.

आंदोलनाचे टप्पे
डिसेंबर१४ रोजी महिन्यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी द्या अन्यथा २३ जानेवारीपासून संपावर जाण्याचे आयुक्तांना निवेदन, डिसेंबरला ताटवाटी आंदोलन, ९, १०, ११ डिसेंबरला काळ्याफिती लावून काम, तर २३ जानेवारीपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन छेडले होते.

विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा गोंधळ
दरम्यान,प्रभारी आयुक्तांच्या दालनात रफीक सिद्दीकी, साजीदखान पठाण, दिलीप देशमुख, उषा विरक, गजानन गवई, गौतम गवई यांनी प्रवेश केला. वॉर्डातील स्वच्छतेची कामे केव्हा होतील, अशी विचारणा दिवेकर यांच्याकडे केली. भारिपचे गजानन गवई यांचा सेनेचे राजेश मिश्रा, उपमहापौर विनोद मापारी यांच्याशी वाद झाला. परंतु, सर्वांनी एकोपा ठेवा, असे आवाहन करण्यात आल्याने वातावरण निवळले.