अकोला- रोटरी नेत्रदान केंद्रातर्फे जागतिक नेत्रदान दिनानिमित्त 10 जून रोजी शहरात मोटारसायकल रॅली काढून नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यात आली. नेत्रदान हे र्शेष्ठदान असल्याने, नेत्रदानाचा संकल्प सर्वांनी करावा, असा संदेश या वेळी देण्यात आला.श्रीराजराजेश्वर मंदिरापासून सायंकाळी रॅलीला प्रारंभ झाला. सिव्हिल लाइन चौकातील आयएमए सभागृह येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. विविध स्लोगन, फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन लोकांना दृष्टी मिळू शकते. आपल्या मरणानंतर नेत्राच्या माध्यमातून आपण जिवंत राहू शकतो, जग पाहू शकतो. आपल्यामुळे दोन दृष्टीहीनांना दृष्टी देण्याचे काम आपल्या हातून घडावे यासाठी प्रत्येकाने मरनोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला पाहिजे, असा संदेश या वेळी देण्यात आला.
या वेळी नेत्रदानाच्या महत्त्वाविषयीचे माहितीपत्र वाटण्यात आले. रॅलीमध्ये रोटरी क्लब ऑफ अकोला, रोटरी क्लब ऑफ अकोला मेन, रोटरी क्लब ऑफ अकोला इस्ट, रोटरी क्लब ऑफ अकोला सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ अकोला मिडटाउन, इनरव्हील क्लब, जय र्शीराम ग्रुप, व्हिजन ग्रुप, नवयुवक मंडळ, महिला मंडळ यांच्यासह विविध सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या.