अकोला- ‘सर्वकलांहुनी श्रेष्ठ कला, सर्वात समरसता लाभावी जीवाला, दृष्टीसी जो जैसा दिसला, आनंद वाटला पाहिजे मना’ या राष्ट्रसंतांच्या ओळीतून जनसामान्यांना आनंद व्हावा, समरसता लाभावी यासाठीच रंगभूमीचा जन्म आहे. पारंपरिक रंगभूमी, लोकरंगभूमी ते आधुनिक रंगभूमी अशा विविध रूपांत कलावंतांनी तिची सेवा केली. नोव्हेंबर या जागतिक मराठी रंगभूमी दिनानिमित्ताने हा आढावा.
रंगभूमी म्हणजे कलावंतांसाठी देऊळच. कलेच्या सादरीकरणासाठी रंगमंच महत्त्वाचा असून, नाट्य ही रंगमंचीय कला आहे. रस्त्यावर, नाट्यगृहात, खुल्या मैदानात नाट्याचे प्रयोग होतात. कलावंतांना उभे राहण्यासाठी, वावरण्यासाठी जी जागा लागते तीच रंगमंच होय. अभिव्यक्त होणे ही सर्वांची गरज असून साहित्य, कला, रंगभूमी चित्रपट त्याचे माध्यम ठरतात. देशभरात पारंपरिक रंगभूमीचा प्रचार-प्रसार दिसून येतो. तामिळनाडूत भागवमेळा, आंध्र प्रदेशात भाभाकलापम, आसाममध्ये अंकियानाट, जम्मू-काश्मीरमध्ये भांडजश्न, बिहार प्रांतात बिदेशिया, ओडिशामध्ये बंदीनाट, छावू, केरळमध्ये कट्टीयट्टम, कर्नाटकात गोम्बेयाट्टा, यक्षगाणं, कोकणात दशावतार, पश्चिम बंगालमध्ये यात्रा, हिमाचल प्रदेशात कारियाला, राजस्थानमध्ये कटपुतली, तंजावरमध्ये करवंजी, उत्तर प्रदेशात ख्याल, राजस्थान-बिहारमध्ये नौटंकी, गुजरात प्रांतात भंवई, तर
आपल्या महाराष्ट्रात तमाशा, असे नाट्य प्रकार आजही आपले अस्तित्व संघर्ष करत टिकवून आहेत. अकोल्यातील रंगभूमीलाही देदीप्यमान असा इतिहास आहे. अनेक ख्यातनाम कलावंतांनी इथल्या रंगभूमीवर भरगच्च रसिकांसमोर आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. मात्र, मधल्या काळात तिला काहीशी घरघर लागली. मात्र, नवोदित नाट्यकर्मींनी पुन्हा त्यात चैतन्य भरण्याचा प्रयत्न चालवला आहे. आज अकोल्यातील उदयोन्मुख नाट्य कलावंत हे मुंबई, पुणे अन् झाडीपट्टीत अापली कला सादर करून अकोल्याचा गौरव वाढवत आहेत.
काहींनी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. ज्येष्ठ रंगकर्मींचा वारसा ते आता पुढे रेटत आहेत. मात्र, येथील नाट्यगृहाचा प्रश्न नाट्यचळवळीच्या विकासातील मोठा अडसर ठरला आहे. अकोला जिल्ह्याच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मोठ-मोठी, अद्ययावत नाट्यगृहे उभी ठाकली असताना अकोल्यातील कलावंतांना अद्याप नाट्यगृहाचा प्रश्न भेडसावत आहे. नाट्य कलावंतांना प्रमिलाताई ओक सभागृह खुले नाट्यगृहाशिवाय पर्याय नाही. खुले नाट्यगृहास अनेक समस्यांनी वेढले आहे. या ठिकाणी समाजकंटकांचा राबता असून, सुविधांचा अभाव आहे.