अकोला- ऑर्थरायटिसहा एक ग्रीक शब्द आहे. ऑर्थरस म्हणजे सांधी आणि आयटिस म्हणजे सूज, म्हणजेच सांध्यांवर येणारी सूज म्हणजे ऑर्थरायटिस. ऑर्थरायटिसचे पाच प्रकार अाहेत. ऑर्थरायटिस हा असा आजार आहे, ज्यात काय किती खावे हे यासाठी आहारतज्ज्ञाचा सल्ला घेतला तर फायद्याचे ठरते. ऑर्थरायटिसच्या लक्षणांकडे आणि आहाराकडे दुर्लक्ष केले, तर आजार वाढू शकतो. संतुलित आहार घेतल्यास ऑर्थरायटिसवर नियंत्रण मिळवता येते.
ऑर्थरायटिस म्हणजे साधा वात, रुमेटाइड ऑर्थरायटिस म्हणजे संधिवात, ऑस्टिओ ऑर्थरायटिस, ज्युव्हेनाइल ऑर्थरायटिस, गाऊट हे ऑर्थरायटिसचे पाच प्रकार आहे. ज्युव्हेनाइल ऑर्थरायटिस हा १६ वर्षांआतील मुलांना होणारा प्रकार आहे. लठ्ठ व्यक्ती ३५ ते ४० वर्षांनंतर स्त्रियांना ऑस्टिअो ऑर्थरायटिस होण्याची दाट शक्यता असते, तर गाऊट या प्रकारात रक्तातील युरीक अॅसिडचे प्रमाण वाढते. साधारणत: रक्तातील युरीक अॅसिडची पातळी दोन ते पाच मिलिग्रॅम असावी. ही पातळी जर सात मिलिग्रॅम असेल, तर गाऊट होण्याची शक्यता असते किंवा गाऊटची सुरुवात झालेली असते.
ऑर्थरायटिस या आजारात आहारावर लक्ष केंद्रित करणे अतिशय गरजेचे आहे. या आजाराचे जसे प्रकार आहेत तसेच प्रत्येक प्रकारानुसार आहारसुद्धा वेगवेगळा घ्यावा लागतो. ऑर्थरायटिस असणाऱ्या लठ्ठ व्यक्तींना प्रथम वजन कमी करणे आवश्यक असते. शरीराचे वजन चालताना किंवा उभे असताना गुडघ्यांवर येते. त्यामुळे वेदना तीव्र होतात. त्यामुळे वजन कमी करणे अत्यावश्यक असते. आमवात म्हणजेच संधिवात हा रोगप्रतिकारक शक्तीशी निगडित असल्याने संधिवात असणाऱ्या व्यक्तीने रोग प्रतिकारक शक्तीला पूरक, असा आहार घ्यावा. डाळिंब, अननस, आवळा, हळद, आलं, संुठ, मिरे यांचा आहारात समावेश करावा. आलं, सुंठ, मिरे हळद यांच्या सेवनाने सूज कमी होऊन त्रासात आराम पडतो. मात्र, याचे अतिसेवन केल्याने त्याचा दुष्परिणाम होतो. गाऊट असणाऱ्या व्यक्तींनी युरीन असणारे पदार्थ टाळावे. चहा, कॉफी, पालक, नॉनव्हेज यांचे सेवन करू नये.
ऑर्थरायटिसची प्रमुख लक्षणे : ऑर्थरायटिसचेप्रकार भिन्न असले, तरी लक्षणे जवळपास सारखेच आहेत. हाताची बोटे, गुडघे दुखणे, जॉइंटमध्ये दिवसभर तीव्र वेदना होणे, सकाळी उठल्याबरोबर तसेच पायऱ्या चढताना गुडघे दुखणे, लिहिताना, हाताच्या बोटांचे जॉइंट दुखणे, मांडी घालून बसायला त्रास होणे हे ऑर्थरायटिसची सहज लक्षात येतील, अशी लक्षणे आहेत.