आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतामध्ये उरले केवळ 1,706 वाघ !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अत्यंत रुबाबदार व एका डरकाळीनेही भल्याभल्यांची पाचावर धारण बसवणारा भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आज अस्तित्वासाठी झगडतो आहे. मागील शंभर वर्षांत जगभरातील 97 टक्के वाघ नाहीसे झाले असून, एक लाख वाघांपैकी केवळ 3,200 वाघ शिल्लक आहेत, तर देशात काही दशकांपूर्वी 40 हजारांवर असलेली त्याची संख्या आज केवळ 1,706 वर येऊन ठेपली आहे.

भारतीय जंगलांचे वैभव म्हणून वाघांकडे पाहिले जाते. शक्तीचे वाहन असलेला वाघच मात्र आज अस्तित्वासाठी झगडत आहे. घनदाट जंगलांचा अभाव व अन्न न मिळणे, शिकार ही वाघांची संख्या कमी होण्याची मुख्य कारणे आहेत. मध्य प्रदेशातील बहेलिया समाज तर त्याच्या मुळावर उठला आहे. अलीकडेच महाराष्ट्रातील ताडोबात झालेल्या वाघांच्या शिकारीने ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जगभरातील चार हजार वाघांपैकी निम्मे वाघ बेंगाल टायगर प्रजातीचे असून, त्यांचे अस्तित्व केवळ भारतात असल्याने जगभराच्या नजरा देशावर लागल्या आहेत. वाघ नष्ट होण्यामागे मागील काही वर्षांत त्याच्या 93 टक्के अधिवासाचा नायनाट, शहरीकरण, शेती, उद्योग, मानव-वन्यजीव संघर्ष, वातावरणातील बदल ही प्रमुख कारणे आहेत. जगभरात सायबेरीयन टायगर, बेंगाल टायगर, इंडोचायनीज टायगर, मलायन टायगर, सुमात्रा टायगर, साऊथ चायना टायगर या प्रजाती असून, आठपैकी तीन उपजाती नष्ट झाल्या आहेत. केवळ पाचच शिल्लक आहेत.

जनजागृतीचा अभाव
मागील दोन वर्षात देशातील वाघांची संख्या 1411 वरुन 1706 वर पोचली आहे. मात्र या वाढलेल्या वाघांचे संरक्षण अत्यंत गरजेचे आहे. टायगर डे सारखे दिवस त्याविषयी जनजागृती करण्यासाठीच असले तरी आपल्या जिल्ह्यात हव्या त्या प्रमाणात साजरे होत नसल्याने जनजागृतीचा अभाव आहे, असे मानद वन्यजीव रक्षक देवेंद्र तेलकर यांनी सांगितले.