आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन अध्यक्ष बिनविरोध होण्याचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या नव्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया शनिवार, 19 जुलै रोजी पार पडणार आहे. त्यासाठी मंगळवार, 15 जुलै रोजी दुपारी नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये यवतमाळ, दिग्रस आणि घाटंजी या तीन ठिकाणी प्रत्येकी एकच नामांकन अर्ज दाखल झाल्याने अर्ज दाखल करणार्‍या सदस्यांनी निवड बिनविरोध होणे जवळपास निश्चित झाले आहे. यामध्ये यवतमाळ नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष राय, दिग्रस पालिकेत परिवर्तन आघाडीच्या सविता धुर्वे आणि घाटंजीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रलेखा रामटेके यांचा समावेश आहे. उर्वरित पाच नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी एकूण 15 नामांकन अर्ज दाखल करण्यात आल्याने तिथे चुरस निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या अध्यक्षांचा कार्यकाळ जून महिन्यात पूर्ण झाला. त्यामुळे या आठही नगरपालिकांच्या अध्यक्षपदी नव्या अध्यक्षांची निवड करण्यात येत आहे. त्यात यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, पुसद, आर्णी, उमरखेड, घाटंजी आणि वणी या आठ नगरपालिकांचा समावेश होता. या सर्व ठिकाणी नव्या नगराध्यक्षांच्या निवडीसाठी राजकारण चांगलेच तापले होते. त्यामध्ये यवतमाळच्या नव्या नगराध्यक्षांच्या निवडीसंदर्भात सुरू असलेल्या सर्व राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळून त्यात यवतमाळच्या नव्या नगराध्यक्षपदासाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिका सदस्य सुभाष राय यांचा एकमात्र अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे नगराध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे निश्चित झाले आहे. याचप्रामाणे दिग्रस पालिकेत राखीव असलेल्या अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी एकमात्र उमेदवार असलेल्या परिवर्तन आघाडीच्या सविता धुर्वे यांनी अर्ज दाखल केल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे. घाटंजीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रलेखा रामटेके यांनी अर्ज दाखल केल्याने त्यांची निवड निश्चित झाली आहे.

आर्णी नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे आरीज बेग मिर्झा यांनी, तर शिवसेनेकडून प्रवीण मुनगीनवार यांनी अर्ज दाखल केले आहेत. वणीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कुरणा कांबळे यांनी, तर मनसेच्या वतीने प्रिया लभाने यांनी नाट्यमय घडामोडीत अर्ज दाखल केला. पुसद येथे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माधवी गुल्हाणे यांनी, तर शिवसेनेच्या वतीने गुरूवाणी यांनी अर्ज दाखल केला. उमरखेड येथे सत्ताधारी काँग्रेसच्या वतीने उषा आलट आणि वंदना घाडगे यांनी, तर विरोधकांची भूमिका बजावणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लक्ष्मीबाई ठाकरे आणि हुमेरा नाज अन्सारी यांनी अर्ज दाखल केले. दारव्हा येथे सर्वाधिक पाच नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये काँग्रेसच्या वतीने अशोक चीरडे, दामोधर लढ्ढा, अली मो. सोलंकी यांनी, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हरीभाऊ गुल्हाने आणि अब्दुल रहमेश शेखजी यांनी नामांकन अर्ज दाखल केले. त्यामुळे या सर्व ठिकाणी नगराध्यक्ष निवडीसाठी चुरस निर्माण झाली आहे.

काँग्रेसला अनुमोदकही मिळाला नाही
नगराध्यक्षपदी वर्णी लागावी यासाठी काँग्रेसच्या वतीने अर्ज सादर करण्यासाठी एक अर्ज नेण्यात आला होता. मात्र अर्ज दाखल करण्यासाठी असलेली दोन वाजेपर्यंतची वेळ संपेपर्यंत तो अर्ज दाखल करण्यात आला नाही. काँग्रेसच्या जवळपास सर्वच सदस्यांनी सुभाष राय यांना समर्थन दर्शवले असल्याने अर्ज नेणार्‍यास अर्जावर स्वाक्षरी करण्यासाठी अनुमोदकही शिल्लक राहिला नसल्याची चर्चा होती.
वरिष्ठ पदाधिकार्‍यांची हजेरी
यवतमाळ येथे नगराध्यक्षपदासाठी सुभाष राय यांचा अर्ज सादर करण्याच्या वेळी सुभाष राय यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप बाजोरीया, भाजपचे माजी आमदार मदन येरावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, बाळासाहेब चौधरी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनिष पाटील, पालिकेचे उपाध्यक्ष जगदीश वाधवाणी, पालिका सदस्य मनीष दुबे, बंटी जयस्वाल, अरुणा गावंडे, मंदा डेरे, वैशाली सवई, रेखा कोठेकर, अमोल देशमुख, दत्ता कुळकर्णी, जयदीप सानप, देविदास अराठे, ज्योती कमलकिशोर मिश्रा, विजू राय यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मुख्याधिकारी रवींद्र पांढरे यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला.

नगरपालिकेत जल्लोष
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष राय यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होताच पालिका सदस्य आणि कार्यकर्त्यांनी प्रथम पालिका कार्यालयासमोर आणि त्यानंतर स्थानिक बालाजी चौकात जल्लोष केला. या वेळी फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. यासोबतच ढोल-ताशे वाजवून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. या वेळी पालिकेच्या जवळपास सर्वच सदस्यांची उपस्थिती होती.