आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या नाकाखाली बाभूळगावात लागली रेड्याची टक्कर, सट्टादेखील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाभूळगाव- कायद्याने बंदी असतानाही यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथे सोमवारी रेड्याची टक्कर खेळवण्यात आली. विशेष म्हणजे या रेड्याच्या टक्करीवर हजारो लोकांनी लाखो रुपयांच्या सट्टा लावला. पोलिसांच्या नाकावर टिच्चून झालेल्या या टकरीने कायद्याची लक्तरे मात्र वेशीवर टांगल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
दिवाळीच्या पर्वावर ग्रामीण भागात रेड्यांच्या टकरी लावण्याची प्रथा आहे. कायद्याने बंदी असल्याने आता अशा प्रकारच्या टक्कर जवळपास बंद झाल्या आहेत. बाभूळगाव तालुक्यातील नायगाव तसेच मिटणापूरच्या मध्यभागी असलेल्या बेंबळा धरणाच्या कालव्यात मात्र कायद्याची पायमल्ली करत आज रेड्याच्या टक्करी लावण्यात आल्या. या ठिकाणी परिसरातील जवळपास 10 हून अधिक रेडे टक्करीसाठी आणले होते. ही टक्कर पाहण्यासाठी यवतमाळ, अमरावती, वर्धासह अनेक जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते. जिंकणार्‍या रेड्यासाठी प्रथम बक्षीस 10 हजार रुपये होते. याव्यतिरिक्त उपस्थित लोकांनीसुध्दा लाखो रुपयांच्या शर्यती येथे रेड्यांवर लावल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या परिसरातील एक राजकीय नेताही यामध्ये सहभागी झाला होता. काही गावातील सरपंचाचा यामध्ये सहभाग होता.

रेड्यांना पाजली दारू
शर्यतीत उतरण्याआधी रेड्यांना दारु पाजण्यात येत होती. शर्यतीदरम्यान दहा रेडे जखमी झाले. परंतु लोकांना फक्त त्यांनी लावलेल्या पैशाची चिंता होती. टायगर, डॉन, टारजन अशी नावे उपस्थित किंचाळत होते.

पोलिसांचे दुर्लक्ष
रेड्याच्या टकरीवर लाखो रुपये उधळल्या गेले. तीन तास दहा पेक्षाही जास्त रेड्याच्या टकरी चालत राहिल्या. गुप्तहेर विभागही या घटनेपासून अनभिज्ञ राहिला. पोलिसांनाही याची बिलकुल ‘खबरबात’ नव्हती.

कारवाई करा
स्वत:च्या मनोरंजनासाठी प्राण्यांच्या अशा टक्करी लावणे हा कायद्याने गुन्हा आहे. नायगाव जवळ लावलेल्या टक्कर प्रकरणात पोलिसांनी कारवाई करावी.’’
-शाम जोशी, पर्यावरणप्रेमी, यवतमाळ