आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस पदाधिकार्‍यांचा नेत्यांविरुद्ध आवाज बुलंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची व्दिधा मनस्थिती झाली आहे. आज बुधवारी काँग्रेसच्या जिल्हाभरातील दुय्यम फळीतील पदाधिकार्‍यांनी बैठक घेऊन आपल्याच पक्षातील नेत्यांविरोधात बंड पुकारले. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना राजीनाम्याचा सल्ला देत प्रस्थापितांना येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली. या घटनेमुळे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर बोलावलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेत्यांविरोधात आपला संताप व्यक्त केला होता. आता पुन्हा एकदा आपल्या मतांवर ठाम असल्याचे दाखवत काँग्रेसच्या दुसर्‍या फळीतील नेत्यांनी आपल्याच वरिष्ठ नेत्यांविरोधात बंड पुकारले आहे. बुधवारी दुपारी यवतमाळ येथील रेमंडच्या विश्रामगृहावर जिल्ह्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. एवढेच नव्हे तर पुढे नेमकी कुठली निती ठरवायची, याचीही चर्चा करण्यात आली. तीन तास चर्चा झाल्यानंतर या नेत्यांनी विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत बैठकीत घेतलेले निर्णय घोषित केले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे अशोक बोबडे, देवानंद पवार, बाळासाहेब मांगुळकर, मोहम्मद नदीम, शंकर बढे, अरुण राऊत, कृष्णा कडू, वजाहत मिर्झा, दिनेश गोगरकर, वसंत राठोड, तातु देशमुख, रामचरण चव्हाण, संतोष बोरले, अजय पुरोहीत, अनिल गायकवाड, शिवाजीराव देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिकार्‍यांनी बैठकीत प्रामुख्याने तीन निर्णय घेतले असून ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्षांचा मागितला राजीनामा
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर घेतलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांची नाराजी समोर आली. त्यामुळे जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार यांनी जिल्हा काँग्रेस कमेटीची कार्यकारिणी बरखास्त केली. यामुळे या पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कार्यकर्ते पदाधिकार्‍यांनी प्रयत्न केले मात्र अपयश आले. त्यामुळे कार्यकर्त्यांवर खापर फोडणे योग्य नसल्याचे सांगत अध्यक्ष वामनराव कासावार यांनी राजीनामा देण्याची मागणी पदाधिकार्‍यांनी केली. राजीनामा न दिल्यास प्रदेश काँग्रेस कमेटीकडे तक्रार करण्यात येणार आहे.
शरद पवारांचे नेतृत्व अमान्य
येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार यांना आघाडीचे नेतृत्व देणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. असे असेल तर याला विरोध करण्याचा निर्णय या पदाधिकार्‍यांनी घेतला. या संदर्भात 30 जून ला सर्व पदाधिकारी दिल्लीला सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी जात आहेत. या निर्णयामुळे आधीच काँग्रेस तसेच राष्टÑवादीमधील वाद पुन्हा विकोपाला जाण्याची शक्यता दिसून येत आहे.
बंड करणारे सर्वच दिग्गज
आपल्याच पक्षातील नेत्यांविरोधात वक्तव्य करणारे हे सर्व पदाधिकारी काँग्रेसमधील दिग्गज पदाधिकारी आहेत. अशोक बोबडे, देवानंद पवार, अरुण राऊत, शंकर बढे, वजाहत मिर्झा, बाळासाहेब मांगुळकर, तातु देशमुख आदी पदाधिकारी हे काँग्रेसच्या विविध आमदारांचे उजवे हात समजल्या जातात. असे असताना त्यांनी पक्षातीलच नेत्यांविरोधात घेतलेला हा पवित्रा चर्चेचा विषय बनला आहे.
उमेदवारीस विरोध
आगामी विधानसभा निवडणुकीत प्रस्थापितांना उमेदवारी देऊ नये अशी धाडसी मागणीही या पदाधिकार्‍यांनी केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या परिवारातील कुणालाच उमेदवारी देऊ नये अशी मागणीही त्यांनी केली. हा निर्णयसुध्दा थेट सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांना भेटून सांगणार असल्याचे पत्रकार परीषदेत सांगण्यात आले.
योग्य निर्णय घेणार
लोकसभेतील पराभव आम्ही स्वीकारला आहे. पदाधिकार्‍यांच्या भावना मी समजू शकतो. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा सन्मान करण्यात येईल. योग्य निर्णय घेऊ.’’
वामनराव कासावार, जिल्हाध्यक्ष.