आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...अन् दु:खानंच जीव घेऊन जाशील का गा..?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - ‘मिरगाचा पाऊस लांबला, मात्र 17 तारखाले झालेल्या पावसानं घात केला. मुस्कीलीन बियानं भेटलं. पेपरायमंदी मानसुन आल्याचं वाचलं त्याले म्या प्रेमानं लावलं बी. पावसाच्या फीकीरीतच पिकानं बी मान काढली व्हती पन सर्व गेल्लं, पिक दुखानच आलं व्हतं अनं दुखानच जीव घेऊन जाशील का गा...’असा आसुसला सवाल अंतरगावातील शेतकर्‍यांनी कोमेजल्या पिकांना केला. पावसाने पाठ फिरवल्याने ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल झालेला आहे.
जिल्ह्यात महिन्याभरापासून वर्षाच्या तुलनेत पाच टक्क््यांहून कमी पाऊस झाला. मान्सून धडकल्याचे शेतकर्‍यांच्या कानावर आदळू लागले. या भरवश्यावर शेतकर्‍यांनी कमी जास्त अंतराने पिक पेरणी करून टाकली. काही जणांनी पाऊस येईल या आशेवर धूळपेरणी केली. दुष्काळात तेराव्या महिन्याप्रमाणे यंदा शेतकर्‍यांसमोर बियाणे टंचाईही उभी ठाकली. यामुळे सोयाबीनच्या ऐवजी महागड्या बीटी बियाण्यांचाच पेरा जास्त झाल्याने नुकसानही मोठे असणार आहे. हवामान विभागाकडून अजूनही महिनाअखेरपर्यत पाऊस होणार नसल्याचे सांगण्यात आल्याने जिल्ह्यांतील शेतकर्‍यांवर आता दुबार पेरणीचे संकट येऊन ठाकले आहे.
जिल्ह्यात झालेला पेरा : जिल्ह्यात कृषी विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार अद्याप 2 लाख 25 हजार 355 हेक्टर खरीप हंगामातील पेरण्या झाल्या आहेत.
पाऊस पाणी जेमतेमच
जिल्ह्यामध्ये यंदा 1 जूनपासून केवळ 54.95 मिलीमीटर पाऊस झाला आहे. दरवर्षी या काळात सरासरी 194.22 मिलीमीटर पाऊस पडतो. यामध्येही केवळ यवतमाळ, नेर, मारेगाव तालुक्यातच 90 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला.
नुकसानभरपाई वाटपाचे तीनतेरा : जिल्ह्यात अनेक शेतकर्‍यांना गत खरिपात अतिवृष्टी, गारपीट, वादळ, रोगराईमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई अजुनही मिळाली नाही. नुकसानभरपाईपोटी शासनाकडून टप्प्याटप्प्याने निधी येणार होता. जिल्ह्यात 2006 मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीचा तोकडा निधी तब्बल पाच सहा वर्षानी आल्यानंतर वितरीत करण्यात आला. यंदाही हीच स्थिती आहे.
कर्जातील पेरले, आता काय...
नगदी पैसे असल्याशिवाय बियाण्यासाठी शेतकर्‍याला दुकानात उभेही ठेवत नाही. कर्जातील बियाणे पेरले, आता काय पेरायचे. गत हंगामातील नुकसानीचे पैसे अजूनही मिळाले नाहीत.’’
साहेबराव कुळसंगे, शेतकरी,डोंगरखर्डा, यवतमाळ
दोन दिवसात पाऊस यावाअन्यथा कठीण
जिल्ह्यात तुषार, ठिबक सिंचन असलेल्या शेतकर्‍यांकडील पिकेच तग धरुन असून याचे प्रमाण कमी आहे. एक-दोन दिवसात पाऊस झाला नाही तर कठीण परिस्थिती निर्माण होणार आहे.
दत्तात्रय गायकवाड, जिल्हा अधीक्षक