आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Sister Ran Away In The Older Sister Marriage

थोरलीचे लग्न अन् धाकटीने आणले विघ्न, थोरलीच्या लग्नातून धाकटी पळाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - तळहाताच्या फौडाप्रमाणे जपलेल्या मुलीची आपल्यापेक्षाही अधिक काळजी घेणारा वर शोधणे मातापित्यांच्या आनंदाचा एक भागच असतो. परंतु, प्रत्येक पित्याच्याच भाळी हे भाग्य लाभते असे नाही. काहींच्या मुली स्वत:च जोडीदार निवडतात अन ज्यांनी सांभाळले त्यांना त्याचा थांगपत्ताही लागू देता एकेदिवशी लाडात वाढलेले घर सोडून निघून जातात. अकोल्यातील एका पित्याच्या वाटेला असाच पण, काहीसा वेगळा अनुभव १८ डिसेंबर रोजी आला. त्या पित्याने एका मुलीची नवऱ्यासोबत पाठवणी केली अनधाकटीने ‘आपला मार्ग मोकळा’ म्हणून प्रियकरासोबत ‘नवी वाट’ धरली. लग्नघरातून करवली हरपल्याची चर्चा सुरू झाली. अखेर त्या पित्याने मुलगी बेपत्ता झाल्याची रीतसर पोलिस ठाण्यात नोंद केली.

येथील एका दाम्पत्याला तीन मुली आहेत. सर्वात थोरल्या मुलीचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले. त्यानंतर दुसऱ्या मुलीसाठी वर शोधून तिचे लग्नही ठरवले. ठरल्याप्रमाणे १८ डिसेंबर रोजी दुसऱ्या मुलीच्या डोक्यावर अक्षता पडल्या. देणे-घेणे, आहेर विधवित सर्व लग्नातील सोपस्कार पूर्ण झाले. मुलीला सासरी पाठवण्याचा ‘तो’ भावनिक क्षणही आला. पाणावलेल्या डोळ्यांनी त्या पित्याने दुसरीची सासरी पाठवणी केली.

त्या वेळी तिच्यासोबत करवली म्हणून मिरवणाऱ्या धाकटीला जाण्यास सांगितले. परंतु, धाकटीने नकार दिला. मुलगी लाजत असावी, असा समज करून सर्वांनी तिच्या नकाराला गांभीर्याने घेतले नाही. रात्री लग्नघरात लग्नातील कमी-जास्तीच्या घटनांची, पाहुणे-रावळ्यांच्या रुसव्या-फुगव्यांच्या गप्पांचा फड रंगला. धाकटी मुलगीसोडून सर्वच यामध्ये सहभागी झाले होते. धाकटीच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळेच सुरू होते. आपणही १० डिसेंबरला वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत. मी पण सज्ञान झाले आहे, अशा विचाराने आपला आपण जोडीदार निवडून त्याच्यासोबतच आयुष्याची गाठ बांधू, असे काहीतरी तिच्या डोक्यात सुरू असावे. आणि गप्पानंतर दमलेले सारे गाढ झोपी गेले. सकाळी एकच कलकल सुरू झाली. धाकटी कुठेच दिसत नव्हती, याची चिंता सर्वांच्या चेहऱ्यावर दिसू लागली. अखेर नंतर धाकटीचे बिंग फुटले. आपल्या प्रियकरासोबत तिने लग्नघरातून पलायन केले होते. हताश पित्याने शोधानंतर पोलिस ठाणे गाठून रीतसर ‘मुलगी हरवली’ असल्याची तक्रार दाखल केली.