आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युवा महोत्सव : विविध राज्यांतील लोककलेचे घडवले दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे जतन व्हावे, युवकांपर्यंत आपली संस्कृती पोहोचावी, या उद्देशाने विद्यापीठस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. शिवाजी महाविद्यालयात सुरू असलेल्या युवा महोत्सवात १९ सप्टेंबरला तरुणाईने त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन केले. दुसऱ्या दिवशी युवकांनी उत्साहात प्रत्येक स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यांना दाद देऊन स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित केला. फक्त महाराष्ट्रच नाही, तर तामिळनाडू, गुजरात अशा विविध राज्यांच्या लोककलेचे दर्शन घडले.

माइम स्पर्धेत यवतमाळातील १८ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. शहरातील वाहतूक समस्या, स्त्रीभ्रूण हत्या, हुंडा पद्धत असे विविध समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला. सोबतच १४ महाविद्यालयांच्या चमूंनी स्किट स्पर्धेत कला सादर केली. पुसद येथील बी. एन. कॉलेजने शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या नाटिकेने खळखळून हसवले. जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी कॉलेजच्या चमूने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या समस्येवर प्रकाश टाकला.
युवकांच्या कलागुणांचे कौतुक करण्यासाठी खासदार संजय धोत्रे यांनी आज हजेरी लावली. प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. खासदारांनी विविध लोकनृत्यांचा आस्वाद घेत युवकांना दाद दिली. विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारताना त्यांनी त्यांच्या महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. तसेच उत्साहात भर घालण्यासाठी काही मंत्र दिले. यासोबतच डॉ. रणजित सपकाळ यांनीही विद्यार्थ्याशी संवाद साधला. आमदार गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया, तुकाराम बिरकड, हरिभाऊ काळे यांनी भेट दिली.
चांदूर बाजार येथील एन. ए. देशमुख महाविद्यालयाच्या चमूने वाघ्या मुरळी नृत्यातून एक वेगळा प्रभाव पाडला. बडनेरा येथील राम मेघे इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीच्या समूहाने नाग डान्स सादर केला. मन डोले डोले हमरो आज सुख दिन आयो रे या गीताचे बोल आणि तालावर थिरकणाऱ्या कलाकारांनी वाहवा मिळवली. अमरावतीतील विनायक विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी तामिळनाडूतील कडघम नृत्य प्रकार सादर केला. हे नृत्य तीन विभागात विभागले असून, शेवटी देवी आणि राक्षसाचे युद्ध साकारले. आदिवासी नृत्य, गोंधळ, जोगवा, कोरकू नृत्य, बंजारा नृत्य, बलुची समाजातील नृत्य प्रकार, रास गरबा, दिंडी नृत्य प्रकार सादर झाले. अमरावतीतील ४५ महाविद्यालयातील युवा कलाकारांनी सादरीकरण केले.
युवा महोत्सवात अनेक नियमांच्या चौकटीत राहून कला सादर करावी लागते. नियमांचे पालन करणे बंधनकारक असले तरी काही विद्यार्थ्यांना याचा विसर पडल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. लोकनृत्यासाठी चित्रपटगीतांचा वापर करता येत नाही. तरीसुद्धा दर्यापूर येथील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जोगवा चित्रपटातील गीतावर नृत्य सादर केल्याने ते स्पर्धेतून बाद करण्यात आले. याचप्रमाणे एकांकिका स्पर्धेत पुसद येथील फार्मसी विद्यालयाने सादर केलेल्या एकांकिकेत गीतांचा भडिमार करण्यात आला. कलाकारांनी कितीही उत्कृष्ट अभिनय केला असला तरी याला एकांकिका म्हणत नाही, तर हे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केलेले नाटिका ठरू शकते, असे मत परीक्षकांनी व्यक्त केले. फक्त उत्साह किंवा गुण किंवा प्रमाणपत्र एवढ्यापुरते मर्यादित राहता खरा अभिनय शिकावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
अनेक स्पर्धांची दविसभर रेलचेल होती. प्रत्येक स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. वसंत सभागृहात अमरावती यवतमाळ जिल्ह्यातील २० चमूंनी शास्त्रीय गीत सुगम गीत सादर केले. शिवमंगल सभागृहात झालेल्या समूहगान स्पर्धेत अमरावतीतील ४४ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. वक्तृत्व स्पर्धेत अमरावती वाशीममधील ४६ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विचार मांडले. वास्तुशास्त्र सभागृहात झालेल्या पोस्टर मेकिंग स्पॉट पेंटिंग स्पर्धेत ११४ स्पर्धकांनी कॅन्व्हासवर रंगांच्या माध्यमातून विविध चित्र रेखाटले. मन, शक्ती आणि बाजार या तीन विषयांवर स्पॉट पेंटिंग केले. सर्व जिल्ह्यातून चार गटात प्रश्नमंजूषा झाली. परीक्षक म्हणून डॉ. दीपक कोचे, डॉ. महेश डाबरे, प्रा. देवेंद्र प्रभुणे यांनी काम पाहिले. मराठा मंडळ मंगल कार्यालयात एकांकिका स्पर्धा झाली. यवतमाळातील १५ महाविद्यालयातील युवा कलावंतांनी त्यांची कला सादर केली.

नवीन कला शिकायला मिळाली
आपल्याराज्यातील लोककलेबरोबरच दुसऱ्या राज्याची कला शिकण्याची संधी यातून मिळाली. तामिळनाडू राज्यातील कडघम हा नृत्य प्रकार शिकताना तेथील संस्कृती, सण, वेषभूषा, इतर पद्धतींचीसुद्धा माहिती मिळाली. ''दिव्या एकलारे,विनायकविद्या मंदिर, अमरावती

टॅलेंटला मिळते प्रोत्साहन
युवामहोत्सवामुळे युवकांच्या टॅलेंटला एक प्रकारे खतपाणी मिळते. आपली कला सादर करण्यासाठी हे सर्वात चांगले व्यासपीठ आहे. याचा सर्वतोपरी फायदा युवकांनी घेतला पाहिजे.'' वैशालीमचाले, महात्माफुले महाविद्यालय, वरुड