आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेच्या बदल्या सापडल्या वादाच्या भोवर्‍यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्हा परिषदेच्या एकाच विभागात पाच किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे ठाण मांडून बसलेल्या आठ कर्मचार्‍यांच्या बदल्यांना 10 जून रोजी अखेर मुहूर्त मिळाला खरा. परंतु, या बदल्या वादाच्या भोवर्‍यात सापडल्या आहेत. काही कर्मचार्‍यांना एकाच विभागात नऊ वर्षे उलटूनही त्यांची बदली करण्यात आली नसल्याने लेखा व वित्त अधिकार्‍यांनी नियमांना धाब्यावर बसवल्याचा आरोप होत असून, दोन कर्मचार्‍यांबाबत ‘सॉफ्ट कॉर्नर’चे धोरण ठेवण्यामागचे गुपित काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने अर्थ विभागात पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचार्‍यांना दुसर्‍या विभागात बदली करताना काहींची वास्तव्य सेवा ज्येष्ठतेनुसार बदली करण्यात आली आहे. मात्र, हाच नियम याच विभागातील दोन कर्मचार्‍यांना लावण्यात आला नाही. वास्तविक या विभागातील दोन कर्मचार्‍यांची सेवा 9 वर्षे झाली आहे. मात्र, दोन कर्मचार्‍यांवर लेखा व वित्त अधिकार्‍यांनी ‘विशेष’ प्रेम दाखवल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे 10 जून रोजी अनेक वर्षांनी बदल्यांच्या मिळालेल्या ‘मुहूर्ता’ला वादाचे ग्रहण लागले आहे. या प्रकाराबाबत बॅकवर्ड क्लास रिझर्वेशन अँड अँक्शन फोर्स कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपकराज डोंगरे यांनी 11 जून रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेण्याची मागणी आहे.
अध्यक्षांनी मागितला खुलासा

बॅकवर्ड क्लास रिझर्वेशन अँड अँक्शन फोर्स कर्मचारी संघटनेच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना झालेल्या नियमबाह्य बदल्याप्रकरणी खुलासा मागितला आहे. बदली प्रक्रियेमध्ये झालेली अनियमितता दूर करून केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याबाबत 11 जून रोजी सायंकाळी लेखीपत्र दिले. या लेखी पत्रानुसार कारवाई होणे अपेक्षीत आहे.