आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातपडताळणीसाठी उमेदवारांची धावपळ सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, अनेक इच्छुकांना अद्याप जातपडताळणी प्रमाणपत्र मिळाले नसल्याने त्यांना धडकी भरली आहे. प्रमाणपत्र वेळेत मिळावे, यासाठी इच्छुकांनी जातपडताळणी कार्यालयाच्या फेर्‍या सुरू केल्या आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काही दिवसांपूर्वी आरक्षण सोडत काडण्यात आली. सोडत निघताच राखीव जागा लढवू इच्छिणार्‍यांनी जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली. मागील निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना जातपडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक नव्हते. या वेळी मात्र हे प्रमाणपत्र राज्य निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. प्रमाणपत्रासाठी लागणारे प्राथमिक व माध्यमिक शाळांचे दाखले, तसेच वंशावळीची जुळवाजुळव करताना अनेकांना अडचण आली. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सेतू कार्यालयात जातपडताळणीसाठी इच्छुकांनी अर्ज केले.

11 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. मात्र, अद्यापपर्यंत जातपडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्याने अनेकांसमोर पेच निर्माण झाला आहे. महा ई-सेवा कार्यालयातून कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर जातपडताळणीसाठी आलेले अर्ज कार्यालयात पाठवण्यात आले. तिथे पुन्हा कागदपत्रांची छाननी केल्यानंतर हे अर्ज जातपडताळणी कार्यालयात पाठवण्यात आले. या कार्यालयाकडून शहानिशा झाल्यानंतर काही व्यक्तींना जातपडताळणी प्रमाणपत्र पोस्टाद्वारे पाठवण्यात आले. परंतु, कागदपत्रांमधील त्रुटीमुळे अनेकांचे अर्ज फेटाळण्यात आले. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अनेकजण कार्यालय गाठत आहेत. इच्छुक उमेदवार दिवसभर या कार्यालयात ठाण मांडून बसत आहेत. काहींनी कागदपत्रांची पूर्तता केली असून, काहीजण शाळा सोडल्याच्या दाखल्याची शहानिशा करणारे पत्र स्वत:च घेऊन येत आहेत. संबंधित शाळांकडून दाखला खरा असल्याचा शेरा घेतल्यानंतर हे पत्र पुन्हा जातपडताळणी कार्यालयात जमा करावे लागत आहे.