आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्‍हा परिषद निवडणूकः आचारसंहिता लागू, राजकीय पक्ष लागले कामाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आचारसंहितेबाबत फॅक्स आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी बैठका, उमेदवारांकडून अर्ज मागवणे, उमेदवारांची निश्चित करणे, एबी फॉर्म या संबंधीची चर्चा सुरू केली आहे. निवडणुकीला 25 दिवस राहिले असल्याने सर्वांनी अगदी कंबर कसली असून, कामाला सुरुवात केली आहे.
बुधवारी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी चर्चा आणि बैठका घेत आढावा घेणे सुरू केले. भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी युतीसाठी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. भारिप-बमसंचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर गुरुवारी पक्षाची बैठक घेण्याची शक्यता आहे. भारिप-बमसं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘एकला चलो रे’ म्हणत निवडणूक लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

होर्डिंग्ज कायमच

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आचारसंहितेबाबत आदेश धडकल्यानंतरही पदाधिकार्‍यांची छायाचित्रे असणारे होर्डिंग्ज काढण्याबाबत प्रशासनाकडून तातडीने हालचाली करण्यात आल्या नाहीत.

आचारसंहितेत पाळावी लागणार अनेक पथ्ये

जिल्हा परिषद आणि सात पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्याचा राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी आदेश दिला. बुधवारी रात्री 12 नंतर ही आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेमुळे राजकीय पक्षांना अनेक बंधने लागू होत आहेत.

मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक

जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे घेण्यात येणार आहेत. मतदारांना मतदान यंत्राची माहिती होण्याच्या दृष्टीने मोठय़ा गावांमधील आठवडी बाजाराच्या ठिकाणी नागरिकांना प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे.

विश्रामगृह बंद

निवडणुकीच्या काळात मतदारांवर प्रभाव पडेल अशा प्रकारचे कोणतेही निर्णय घ्यावयाचे झाल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे विचारणा करावी लागेल. निवडणुकांचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता अंमलात राहणार आहे. जिल्ह्यातील शासकीय विर्शामगृहे आचारसंहितेच्या कक्षेत राहणार आहेत.

मनसे स्वबळावर
मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार असून, गुरुवारी पक्षाचा कार्यक्रम निश्चित होईल. पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुधाकर तांबोळी यांच्याशी चर्चा केल्यानंतर इतर निर्णय जाहीर करण्यात येतील.’’ विजय मालोकार, जिल्हाध्यक्ष, मनसे

मुलाखती सुरू
शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटप सुरू झाले आहे. भाजपसोबत युतीची चर्चा सुरू आहे. याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर होईल. युतीचा निर्णय झाल्यानंतर उमेदवारांची यादी निश्चित केली जाईल.’’
श्रीरंग पिंजरकर जिल्हाप्रमुख, शिवसेना.

सशक्त पर्याय
भाजप सशक्त पर्याय देणार आहे. गुरुवारपासून पक्ष अर्ज घेण्यास सुरुवात करणार आहे. भाजप व शिवसेनेत युतीबाबत चर्चा सुरू आहे. वरिष्ठांशी चर्चा झाल्यानंतर उमेदवारांची व युतीची घोषणा करण्यात येईल.’’
तेजराव थोरात, जिल्हाध्यक्ष, भाजप

पॅनल देणार
पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे पॅनल देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. पक्ष निरीक्षक झिया पटेल यांचे या प्रक्रियेवर लक्ष आहे. पक्ष सक्षम उमेदवार देणार असून, मुलाखतीनंतर उमेदवारी निश्चित केली जाईल.’’
बाबाराव विखे पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

तयारी पूर्ण
पक्षाकडून तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवारी इच्छुकांचे अर्ज स्वीकारणार आहे. पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात अर्ज स्वीकारले जातील. 9 तारखेला निवड मंडळाची बैठक होऊन इच्छुकांच्या मुलाखती होतील. ’’
श्रीकांत पिसे पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस