आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारिप-बमसंने साधला डाव; महायुतीवर घातला घाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीच्या एक तास आधी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक व नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारिप-बमसंच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली. या घोषणेने भारिप-बमसंची सत्ता स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झाले. आज सकाळपासून राजकीय घडामोडींना जोरदार वेग आला होता. पण, या पत्रकार परिषदेनंतर सर्वच चित्र बदलले आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा पाठिंब्याची घोषणा देत भाजपला एकाकी पाडले. शिवसेनेने काँग्रेस आघाडीसोबत बसणार नाही, अशी भूमिका घेत एक दिवस अगोदर अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता, हे विशेष. त्यामुळे भारिप-बमसंने डाव साधत निवडणुकीपूर्वी भाजपने पुढाकार घेत जुळवलेल्या महायुतीवर घाव घातला.

अँड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पाठिंब्याची मागणी केली. काँग्रेसने पाच सदस्यांचा पाठिंबा भारिप-बमसंला दिल्याचा दावा काँग्रेसचे पक्ष निरीक्षक अशोक धवड यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. काँग्रेसला एक सभापतीपद मिळणार असून, त्याबाबत पक्षात मतभेद नसून, स्थानिक व प्रदेश पातळीवर हा निर्णय संयुक्तपणे घेतल्याचा दावा धवड यांनी केला. हा पाठिंबा लोकसभेची पूर्वतयारी आहे का, असे विचारले असता त्यांनी याबाबत पक्षर्शेष्ठी निर्णय घेतील, असे स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला पक्ष निरीक्षक झिया पटेल, प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर गणगणे, जिल्हाध्यक्ष बाबाराव विखे, लक्ष्मणराव तायडे, बबनराव चौधरी, नातिकोद्दीन खतीब, हिदायत पटेल, महेंद्रसिंग सलुजा, विजय देशमुख, अविनाश देशमुख, र्शावण इंगळे, प्रकाश तायडे, मोहंमद युसूफ आदींची उपस्थिती होती.
अठराव्या मिनिटाला राष्ट्रवादीचा निर्णय

काँग्रेसने पक्षादेश काढत भारिप-बमसंला पाठिंबा देण्याची घोषणा दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेत केली. ही पत्रकार परिषद सुरूअसताना काँग्रेस नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष र्शीकांत पिसे यांनी फोन करत काँग्रेसचा ज्यांना पाठिंबा असेल, त्यांना आमचा पाठिंबा असेल, असे सांगितल्याचे पक्ष निरीक्षक अशोक धवड यांनी स्पष्ट केले. 2 वाजता सुरू झालेल्या पत्रकार परिषदेनंतर केवळ अठराव्या मिनिटांत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय घेत भाजपला झटका दिला.

शिवसेना आणि भाजप एकत्र
राजकीय घडामोडीत अप्रत्यक्षपणे युतीमधील मतभेद समोर आले. महायुतीच्या सत्ता स्थापनेसाठी भाजपने पुढाकार घेतला होता. पण, शिवसेनेने त्यास विरोध करत त्यावर पाणी फेरले. या सर्व प्रकारानंतर आज शिवसेना व भाजप सदस्य हे येथील भाजप नेत्याच्या हॉटेलवर एकत्र आले होते. त्यांच्यामध्ये शिवसेना आणि भाजप आमदारांसह वरिष्ठ नेत्यांचा सहभाग होता.

कामात सोबत
भारिप-बमसंची सत्ता जी जनहिताची कामे करेल त्या सर्व कामांच्या सोबत आम्ही राहू. जनतेच्या हितापासून ही सत्ता भटकली, तर त्याचा विरोध काँग्रेस निश्चित करेल. सत्तेला दिलेला पाठिंबा जनहितार्थ दिला आहे. या सत्तेच्या कुठल्याही चुकीच्या निर्णयाच्या सोबत आम्ही राहणार नाही. काँग्रेस जिल्हा परिषदेतील सत्तेवर लक्ष ठेवणार आहे. अशोक धवड, पक्ष निरीक्षक, काँग्रेस.


विरोध नाही
काँग्रेसचा भारिप-बमसंला दिलेला पाठिंबा हा सर्वानुमते घेण्यात आला आहे. यात स्थानिक काँग्रेसचा विरोध नव्हता. या निर्णयामुळे पक्ष हिताला प्राधान्य देण्यात आले आहे. बाबाराव विखे पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.