आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाशिममध्ये 70 टक्के मतदान; निकाल आज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिम- जिल्हा परिषदेच्या 52 तर पंचायत समितीच्या 104 सदस्य निवडीसाठी रविवारी सरासरी 70 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील सहा तालुक्यांत एकूण 1 हजार 125 मतदान केंद्रे होती. मतदानादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. काही ठिकाणी किरकोळ वाद झाले, मात्र ते गावपातळीवर सामंजस्याने मिटवले. उद्या, सोमवारी सकाळी 10.30 वाजेपासून तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.

जिल्हा परिषदेसाठी 327 तर पंचायत समितींसाठी 555 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 2008 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्या वेळी दोन्ही पक्षांचे प्रत्येकी 16-16 सदस्य निवडून आले होते. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी आघाडी स्थापन करून अडीच-अडीच वष्रे सत्ता उपभोगली. यावेळीसुद्धा या दोन्ही पक्षांनी आघाडी न करता सर्व मतदारसंघांत निवडणूक लढवली आहे. त्यांच्यापुढे शिवसेना-भाजप युतीचे आव्हान होते. भारिप-बमसंनेही जिल्हा परिषदेच्या 38 तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 34 मतदारसंघांत आपले उमेदवार उभे केले आहेत.

लढत तिरंगीच :
ही निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-भाजप युती अशी तिहेरी झाली. काही ठिकाणी भारिप-बमसं, मनसे आणि अपक्षांनी आव्हान उभे केले. पण, सत्तेची सूत्रे या तिघांपैकीच एकाच्या हाती जाईल, असा अंदाज तज्ज्ञ करीत आहेत.

येथे होणार मतमोजणी
शेतकरी निवास, मंगरुळपीर रोड, कारंजा. तहसील कार्यालय, मंगरुळपीर
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मानोरा. तहसील कार्यालय, मालेगाव
पंचायत समिती सभागृह, रिसोड ऑफिसर्स क्लब, बस स्टँड समोर, वाशिम.

असे झाले मतदान
सकाळी 9.30 : 7.66 टक्के , दुपारी 11.20 : 20.48 टक्के , दुपारी 1.30 : 34.67 टक्के , दुपारी 3.30 : 48.11 टक्के , सायंकाळी 5.30 : 70 टक्के