आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारिप-बमसं, शिवसेनेच्या विद्यमान सदस्यांना डच्चू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - भारिप बहुजन महासंघाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शुक्रवारी जारी केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत एकाही विद्यमान जि. प. सदस्यांना स्थान मिळालेले नाही. सर्व ठिकाणी नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. गोपाळ कोल्हे (तेल्हारा) आणि सुजाता निकोसे (बार्शिटाकळी) या दोन पं. स. सभापतींना आता जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरवण्यात आले असून, रमेश आकोटकर (अकोट) यांना मात्र पुन्हा पं. स.ची उमेदवारी मिळाली आहे. जि. प. अध्यक्ष पुष्पाताई इंगळे यांच्या शिर्लासह पाच गटांचा निर्णय नंतर होणार आहे. परिणामी, दुसरी यादी येईपर्यंत पुष्पाताई इंगळे, समाजकल्याण सभापती उषा मुरळ, महिला व बालकल्याण सभापती आशा घाटोळ, माजी उपाध्यक्ष दामोदर जगताप आणि माजी अध्यक्ष साबिया अंजुम यांचे भवितव्य अधांतरी लटकले आहे.

गेल्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि सातही पंचायत समित्यांमध्ये भारिप-बमसंने बाजी मारली होती. त्या वेळी या पक्षाचे 20 उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अनेक विद्यमान सदस्यांना उमेदवारीची शक्यता होती. मात्र पक्षाने आजच्या यादीतून वगळल्याने सर्व विद्यमान जि. प. सदस्यांना जोरदार धक्का बसला आहे. यापैकी काही सदस्यांनी आपली नाराजी व्यक्त केली असून, काहींनी पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले. निवड समितीमधील जिल्हा महासचिव शेख साबीर शेख मुसा आणि दिनकर वाघ या दोघांना जि. प. उमेदवारी मिळाली आहे.

जिल्हा परिषदेमध्ये पक्षाच्या सदस्यांनीच अध्यक्षांना उघड आव्हान दिल्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार ढेपाळला होता. अनेक विद्यमान सदस्यांच्या विरोधात अँड. प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर पारस येथे झालेल्या एका गुप्त बैठकीत विद्यमान सदस्यांना घरी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर अकोल्यातील एका सभेत विद्यमान सदस्यांना काही दिवस सहन करण्याचा सबुरीचा सल्ला अँड. आंबेडकर यांनी नाराज कार्यकर्त्यांना दिला होता. पारसच्या बैठकीतील निर्णय आणि अँड. आंबेडकर यांचा सल्ला आज जारी झालेल्या उमेदवारी यादीतून प्रत्यक्षात उतरवण्यात आला. जि. प. अध्यक्ष पुष्पाताई इंगळे यांचा शिर्ला गट, माजी उपाध्यक्ष दामोदर जगताप यांचा मलकापूर गट, आशाताई घाटोळ यांच्या वाडेगाव गटातील उमेदवारांची नावे जाहीर न झाल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. पाथर्डी गटातून जि. प.च्या माजी सदस्या शोभाताई शेळके यांना, तर पक्षाचे ज्येष्ठ नेते डी. एन. खंडारे यांना शिरसो गटातून उमेदवारी देण्यात आली आहे.