आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकस्त निवासस्थानांमुळे कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा बंगला वगळता इतर अधिकारी, कर्मचार्‍यांची निवासस्थाने शिकस्त झाली आहेत. या शिकस्त जागेमुळे जीवाला धोका निर्माण झाला आहे. या शिकस्त निवासस्थानाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.

शहरात टॉवरपासून काही अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शासकीय निवासस्थानाची दयनीय अवस्था झालेली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या बंगल्यासह जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत जवळपास 65 शासकीय निवासस्थाने आहेत. त्यात रतनलाल प्लॉटमध्ये चौधरी विद्यालयासमोरील निवासस्थानामध्ये 25 कर्मचार्‍यांचे कुटुंब राहतात. योग्य देखभाल व दुरुस्तीअभावी काही निवासस्थाने जीर्णावस्थेत आहेत. अत्यंत कमी भाडे आकारून कर्मचार्‍यांना निवासस्थाने दिली जातात. प्रत्येक निवासस्थानामध्ये राहणारी कुटुंबे आणि साजरे होणारे कार्यक्रम यामुळे कधीकाळी या परिसरात चांगले वातावरण होते.

कोण आहे जबाबदार
या निवासस्थानाच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र, याकडे विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसते. कर्मचार्‍यांकडून डागडुजी, दुरुस्तीची ओरड होत असताना जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष दिसून येते.

अध्यक्षांवर मेहेरबानी
मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे व जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पाताई इंगळे यांच्या बंगल्याची चमक मात्र कायम आहे. पुष्पाताईंचा बंगला या शेजारीच आहे. तरीही कर्मचार्‍यांची निवासस्थाने समस्यांच्या विळख्यात सापडली असताना अध्यक्षांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांनी या समस्येकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना भेटणार
निवासस्थानाच्या दुरवस्थेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून निवेदन देऊ. कर्मचार्‍यांना अशाप्रकारचा त्रास होणे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.’’सुभाष सिरसोदे, राज्य कर्मचारी संघटना

मातब्बर राजकारण्यांचे एकेकाळी वास्तव्य
माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर, आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार दशरथ भांडे, माजी आमदार तुकाराम बिरकड, दे.ना.तिरुख, बाबाराव विखेपाटील, दादा मते पाटील, शिवाजीराव देशमुख, किसनराव देशमुख, लक्ष्मीकांत महाकाळ, आमदार हरिदास भदे आदी राजकारणी एकेकाळी याच निवासस्थानी वास्तव्यास होते.

पथदिवे नाहीत
या परिसरात पथदिवे नाहीत. त्यामुळे चोरीच्या घटना घडतात. शिवाय अतिक्रमणानेही विळखा घातला आहे. यातून सुटका कधी होईल हा प्रo्नच बनला आहे. वारंवार निवेदने देऊनही काही उपयोग होत नाही ’’ वैशाली खोडके, रहिवासी

कुणाचेही लक्ष नाही
पिण्याचे पाणी नाही, रस्ता नाही, निवासस्थानांना गळती लागली आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. या भागात गवत वाढल्याने साप निघतात त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.’’ गंगा गायकवाड, रहिवासी

चौकशी करणार
निवासस्थानाची दुरवस्था झाली असेल, तर याची चौकशी करण्यात येईल. बांधकाम विभागाला दुरुस्तीबाबत यापूर्वीच पत्र पाठवण्यात आले आहे. नगरसेवकांशीसुद्धा मूलभूत सुविधा पुरवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यात येईल.’’ पुष्पाताई इंगळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद

मंजुरी आल्यानंतर दुरुस्तीस प्रारंभ
निवासस्थानांच्या दुरुस्तीबाबत 35 लाखांचे इस्टिमेट तयार केलेले आहे. मंजुरीकरिता वरिष्ठांकडे पाठवले आहे. मंजुरी मिळाल्यानंतर तत्काळ दुरुस्तीस सुरुवात केली जाईल.’’ अशोक वाकोडे, अभियंता, बांधकाम विभाग.