आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक बदल्यांना विरोध; जिल्ह्याबाहेर जाण्याची स्पर्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मनपाच्याकोणत्याही विभागातील बदल्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरतात. सफाई कामगार असो की शिक्षक प्रत्येकाला आपल्या निवासी भागातच काम हवे असते. त्यामुळे या बदल्यांना प्रचंड विरोध केला जातो. यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर करण्यासही मागे-पुढे पाहिले जात नाही. परंतु, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात महापालिकेत वेगळेच चित्र दिसत आहे. या ३० शिक्षकांमध्ये समावेश व्हावा, यासाठी शिक्षकांमध्ये चढाओढ सुरू आहे.

राज्य शासनाच्या धोरणानुसार ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असणे गरजेचे आहे. महापालिकेच्या एकूण ५५ शाळा आहेत. हिंदी, मराठी, उर्दू माध्यमाच्या या शाळांमध्ये एकूण आठ हजार ५६ विद्यार्थी शिक्षण घेतात, तर शिक्षकांची संख्या ३२६ आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या या धोरणानुसार महापालिकेत ३० शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. नव्या नियमानुसार शिक्षकांचे वेतन ऑनलाइन देणे बंधनकारक आहे. परंतु, यासाठी शिक्षकांचे समायोजन करणेही गरजेचे आहे. महापालिकेत ३० शिक्षक अतिरिक्त ठरल्याने आणि त्यांचे समायोजन झाल्याने पुढील प्रक्रियाही रखडली आहे. या ३० शिक्षकांचे समायोजन जिल्ह्याबाहेर अथवा जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर करावे लागणार आहे. या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन नेमके कोणत्या शाळेत करायचे याबाबतचा निर्णय शिक्षण उपसंचालकांना घ्यावा लागणार आहे. या अनुषंगाने महापालिका शिक्षण विभागाने समायोजनाचा प्रस्ताव अमरावती येथील शिक्षण उपसंचालकांकडे पाठवला आहे. आता शिक्षकांना समायोजनाचे वेध लागले आहे.
*अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रस्ताव अमरावती शिक्षण उपसंचालकांकडे पाठवलेला आहे. अद्याप समायोजनाचा प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झालेला नाही. प्रदीपचौरे, प्रशासनअधिकारी, शिक्षण विभाग महापालिका, अकोला.
बदलीसाठी सर्वकाही
३०शिक्षकांच्या यादीत आपल्या नावाचा समावेश व्हावा, यासाठी अनेक शिक्षक प्रयत्नशील आहेत. बदलीस विरोध करण्यासाठी राजकीय दबावाचा वापर करणारे शिक्षक आता सर्वकाही करण्यास तयार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे या बदल्यांना अर्थकारणही जोडले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

५८ शिक्षक अतिरिक्त
३०विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, असे धोरण तर कमी विद्यार्थी असले तरी एका शाळेत दोन शिक्षक, असाही नियम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या धोरणाने विचार केल्यास ५८ शिक्षक अतिरिक्त ठरतात. मात्र, विद्यार्थी पटसंख्या आणि एका शाळेला दोन शिक्षक या सयुक्तिक धोरणामुळे ३० शिक्षक अतिरिक्त ठरले आहे.

महापालिकेत दर महिन्याला वेतन मिळत नसल्याने शिक्षक त्रस्त आहेत. शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. परंतु, दर महिन्याला वेतन मिळत नसल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच महापालिका क्षेत्रांतर्गत बदलीसाठी विरोध करणारे शिक्षक आता महापालिका क्षेत्राबाहेर बदलीसाठी मात्र इच्छुक आहे. बदलीसाठी इच्छुक असे चित्र महापालिकेत प्रथमच पाहावयास मिळत आहे.