आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्याध्यापक समायोजनासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - आरटीई कायद्याअंतर्गत या वर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात बरेच बदल होत आहेत. याच अनुशंगाने जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या 121 मुख्यध्यापकांच्या समायोजनाची तयारी पूर्णत्वास आली आहे. 15 जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या उपस्थितीत हे समायोजन करण्यात येणार आहे.
समायोजन होणार म्हणून एकीकडे मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला असला तरी समायोजनानंतर उरलेल्या काही मुख्यध्यापकांना रिक्त जागेअभावी मूळ तालुक्यात वगळता अन्य ठिकाणी समायोजित केल्या जाण्याची शक्यता आहे.

या वर्षी आरटीई कायद्यानुसार बरेच बदल घडून आले आहेत. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे पटसंख्येअभावी शाळेचे समायोजन, विद्यार्थ्यांचे समायोजन, वर्ग चौथीला पाचवी व सातवीला आठवी जोडणी आदी कामे करण्यात आली. यामुळे शिक्षकांसह मुख्याध्यापकही अतिरिक्त ठरले आहेत. जिल्ह्यात शाळा सुरु होण्यापूर्वीच ही पदे भरली जातील अशी शिक्षण विभागात चर्चा होती. मात्र, तांत्रिक अडचणी आल्याने व वरिष्ठांकडून स्पष्ट निर्देश नसल्याने ही प्रक्रिया मंदपणे सुरु होती. सध्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने समयोजनासाठी पूर्ण माहिती मिळवली आहे. 15 जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात समायोजनाची प्रक्रिया होणार आहे.

बदलीची टांगती तलवार : जिल्ह्यातील अनेक मुख्याध्यापकांना आपली शाळा सोडावी लागणार आहे. दुसरीकडे काही तालुक्यांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांची संख्या रिक्त जागेपेक्षा अधिक आहे. यात बुलडाणा, चिखली, देऊळराजा, सिंदखेडराजा, मलकापूर आदी तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणच्या मुख्याध्यापकावर बदलीचे सावटही आहे.
तारखेचा घोळ संपेना
अतिरिक्त ठरलेल्या मुख्यध्यापकांच्या समायोजनासंदर्भात जिल्हा परिषदेने आधी 11 जुलै अशी तारीख ठरवली होती. नंतर ही तारीख 15 जुलै करण्यात आली. शनिवार, 5 जुलै रोजी सायंकाळी या संदर्भात संचालकांचे पत्र मिळाले. त्यात समायोजन 10 जुलैपूर्वी करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या संदर्भात 6 जुलै रोजी अंतिम निर्णय घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात शाळांची परिस्थिती
- 1413 जिल्हा परिषदेच्या एकूण प्राथमिक शाळा
- 107 नगरपालिकेच्या एकूण प्राथमिक शाळा
- 798 जिल्ह्यातील एकूण खासगी प्राथमिक शाळा
- 7 नगरपालिका हायस्कूल
- 2325 जिल्ह्यातील एकूण प्राथमिक शाळा

नियमानुसार होणार समायोजन
- जिल्ह्यात पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांच्या समायोजनाचे काम प्रशासनाकडून आता पूर्ण झाले आहे. 15 जुलै रोजी समायोजन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी अशा मुख्यध्यापकांना रिक्त जागेसंबंधी प्रशासनाकडून नियमाप्रमाणे नियुक्तीबाबत संधी दिली जाणार आहे. ’’ मदन आंधळे, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, बुलडाणा