आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक खेळाडूंना डावलल्याने बाचाबाची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड केलेल्या यादीमधून शिक्षक खेळाडूला डावलल्यावरून जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. हा प्रकार बुधवारी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या आवारात घडला.

अमरावती येथे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. 23, 24 व 25 जानेवारी अशा तीन दिवस होणार्‍या या स्पर्धांसाठी जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या सर्व विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांची नावे पाठवण्याबाबत सामान्य प्रशासन विभागातर्फे आवाहन केले होते. या स्पर्धेसाठी जाणार्‍या खेळाडूंच्या नावाची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांच्या मंजुरीने तयार केली होती. गेल्या वर्षीच्या यादीमधीलच नावे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कायम ठेवत सर्व खेळाडूंना खेळण्यासाठी हिरवी झेंडी दिली होती. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांनी या यादीत बदल करत चार शिक्षकांना डावलले.

या प्रकाराची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे चोंढी (ता. पातूर) गटाचे सदस्य नितीन देशमुख यांनी शिक्षकांना न्याय देण्यासाठी धाव घेतली. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांची भेट घेतली. मात्र, चर्चेदरम्यान शिक्षक खेळाडूंची नावे हेतुपुरस्सर डावलल्याचा आरोप त्यांनी इनामदार यांच्यावर केला. या वेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

खेळाडूंनी विभागाशी संपर्क करायला हवा होता
खेळण्यासाठी इच्छुक असलेल्या खेळाडूंनी प्रत्यक्ष सामान्य प्रशासन विभागाशी संपर्क करायला हवा होता. सदस्यांकडे जाण्याची काहीही गरज नव्हती.’’ जावेद इनामदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जि. प.

हा तर हेकेखोरपणा
सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख असलेल्या इनामदार यांनी चांगले खेळाडू असलेल्या चार शिक्षकांना कोणताही अधिकार नसताना यादीतून हेतुपुरस्सर डावलले. सीईओंच्या मंजुरी आदेशाची एकप्रकारे त्यांनी अवहेलनाच केली आहे.’’ नितीन देशमुख, जिल्हा परिषद सदस्य.