आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी ‘रस्सीखेच’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पक्षीय बलाबल असतानाही भारिप बहुजन महासंघाला सत्ता स्थापन करणे कठीण होत आहे. दुसरीकडे हाती केवळ 19 सदस्य असतानाही सत्तेसाठी महायुती स्थापन करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यासाठी भारिप-बमसं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सध्यातरी भारिप-बमसंतर्फे कुरणखेड गटाचे सदस्य शरद नामदेवराव गवई व हातगाव गटाचे सदस्य रवींद्र गोपकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. 2013 च्या निवडणुकीत भारिप-बमसंने सर्वाधिक 22 जागा मिळवल्या आहेत. भाजपला 11 तर, शिवसेनेला आठ जागा मिळाल्या. काँग्रेसला पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले. पाच अपक्षांनी निवडणुकीत बाजी मारली आहे. अध्यक्षपदाची निवडणूक चार दिवसांवर आली असतानाही सत्तेबाबत चित्र स्पष्ट झाले नाही. त्यामुळे भारिप-बमसंला सत्ता काबीज करायची असेल तर, काँग्रेस किंवा अपक्षांना हाताशी धरावे लागेल. जिल्हा परिषदेत सध्यातरी भारिप-बमसंची सत्ता येण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड 30 डिसेंबरला होणार आहे. अध्यक्षपदासाठी भारिप-बमसंच्या मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव जिल्हा परिषद गटाचे रवींद्र गोपकर व अकोला तालुक्यातील कुरणखेड येथील शरद गवई या दोघांच्या नावाची चर्चा आहे. 24 डिसेंबरला भाजप नेते तथा खासदार संजय धोत्रे यांनी महायुती स्थापन करत असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप अधिकृत घोषणा न झाल्याने महायुतीच्या निर्मितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसते.

अध्यक्षाची निवड 30 डिसेंबरला
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड 30 डिसेंबरला होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया चार दिवसांवर आली. मात्र, अद्यापही सत्तेचे चित्र स्पष्ट झाले नाही.

पंचायत समिती सभापतींची निवड 28 डिसेंबरला
सातही तालुक्यांच्या पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड 28 डिसेंबरला होत आहे. याकरिता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्ररीत्या विशेष सभा स्थानिक तहसील कार्यालयात आयोजित केली आहे.

नेत्यांची चर्चा सुरू
महायुती करण्याबाबत खासदार संजय धोत्रे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची चर्चा सुरू आहे. महायुतीच्या स्थापनेबाबत वरिष्ठ नेत्यांचा निर्णय अंतिम असेल. तेजराव थोरात, जिल्हाध्यक्ष, भाजप.

काँग्रेससोबतच राहणार
आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता मित्रपक्ष काँग्रेससोबतच राहणार आहे. याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेबाबत तूर्त सांगणे कठीण आहे. र्शीकांत पिसे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.

निर्णय झाला नाही
जिल्हा परिषदेसाठी भारिप-बमसंसोबत जायचे की महायुतीत, याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. 28 डिसेंबरला पंचायत समिती सभापतीपदासाठी निवड झाल्यानंतर निर्णय होईल. बाबाराव विखे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.