आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • युवकांची फसवणूक; घातला लाखांचा गंडा

युवकांची फसवणूक; घातला लाखांचा गंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - माहुली जहागिर परिसरातील इंडिया बुल्स पॉवर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीने दोन युवकांकडून एक लाख पाच हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मुलाखत झाल्यानंतर या युवकांना संबंधितांनी ऑफर लेटर दिले. ते घेऊन युवक प्रकल्प परिसरात आले असता, कंपनीकडून अशी कोणतीही निवडप्रक्रिया झाली नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. दुसरीकडे, कंपनीला बदनाम करण्याचा हा कट असल्याचे सांगत इंडिया बुल्स कंपनीचे सहायक महाप्रबंधकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

विक्की प्रदीप झगडे (21 रा. यवतमाळ) आणि रवि दिलीप गवई (रा. बुलडाणा) अशी फसवण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत. त्यांना नरेंद्र नामक व्यक्तीने ई-मेल पाठवून इंडिया बुल्सच्या प्रकल्पामध्ये नोकरीसाठी बायोडाटा पाठवण्यास सूचवले. या दोघांनी नरेंद्रच्या ई-मेलवर बायोडाटा पाठवला. त्यांना 22 आणि 24 ऑक्टोबरला शहरातील बसस्थानकावर बोलावून जवळच एका कारमध्ये त्यांच्या मुलाखती पार पडल्या. त्यावेळी विक्की झगडेने 45 हजार आणि रवि गवईने 60 हजार रुपये नरेंद्रला दिले होते.

तुमची निवड झाली आहे. तुम्ही 30 ऑक्टोबरला मुंबई येथे मुख्य कार्यालयात येऊन ऑफर लेटर घेऊन जा, असे त्याने सांगितले. ठरल्यानुसार ते दोघे मुंबईला गेले. नरेंद्रने त्यांना बाहेरच गाठून इंडियाबुल्सच्या लेटर पॅडवर लिखित स्वरूपातील ऑफर लेटर दिले. दोघेही नोकरीवर रुजू होण्यासाठी प्रत्यक्षात माहुली जहागिर येथील इंडियाबुल्स प्रकल्प कार्यालयात गेले. मात्र, अशी कोणतीही भरतिप्रक्रिया कंपनीकडून झाली नाही व ऑफर लेटर दिले नाही, असे त्यांना स्पष्ट करण्यात आले. त्यांनी आणलेले लेटर पॅड बनावट असल्याचे सहायक महाप्रबंधक प्रवीण शंकर यांच्यातर्फे प्रवीण थोरात यांनी दाखवून दिले.

कंपनीला बदनाम करण्याचा हा घाट असल्याचे मानून थोरात यांनी माहुली जहागिर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. युवकांकडून रक्कम बसस्थानक परिसरात घेतल्याने फसवणुकीचे हे प्रकरण शहर कोतवाली ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री कोतवाली पोलिसांनी नरेंद्र नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल केला.