आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • दहा हजार कोटींचा सोन्याचा साठा जमिनीच्या पोटात दडून

दहा हजार कोटींचा सोन्याचा साठा जमिनीच्या पोटात दडून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - एकीकडे उत्तर प्रदेशात एका साधूला स्वप्नात दिसलेला सोन्याचा साठा शोधण्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने पुरातन किल्लय़ात उत्खनन केले, तर दुसरीकडे एका कंपनीने सर्वेक्षणाअंती शोधून काढलेला सोन्याचा साठा अभयारण्य जाहीर झाल्यामुळे आता जमिनीच्या उदरातच गडप होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कंपनीने केलेली विनंतीही महाराष्ट्र शासनाने धुडकावून लावल्याने सोन्यासह टंगस्टन, झिंक व तांबे या धातूंचा दहा हजार कोटी रुपये किमतीचा साठाही कायम जमिनीखाली राहील.

गडचिरोली व चंद्रपूर जिल्हय़ातील जमिनीत असलेला हिर्‍याचा पट्टा शोधण्यासाठी दिलेले पूर्व पाहणी परवाने कंपन्यांनी नक्षल प्रभावामुळे परत केले, तर दुसरीकडे सोन्याचा साठा शोधण्यासाठी तीन कोटी रुपये खर्च केल्यावर नवे अभयारण्य घोषित झाल्याने कंपनीला काम थांबवावे लागल्याची माहिती भू-विज्ञान व खनिकर्म संचालनालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्हय़ात असलेल्या हिर्‍याच्या पट्टय़ाचे (डायमंड बेल्ट) संशोधन करण्यासाठी डी. बी. एस. व रिओ टिंटो या दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांना राज्य सरकारने हेतुपत्र दिले. यापैकी डी. बी. एस. कंपनीला 9,951 चौरस कि. मी., तर रिओ टिंटो कंपनीला 6,151 चौरस कि. मी. पट्टय़ात संशोधन करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली होती. परवाना तीन वर्षांसाठीचा होता.

परवान्यातील अटींनुसार पहिल्या वर्षी केवळ हवाई सर्वेक्षण, दुसर्‍या वर्षी एक हजार चौरस कि. मी. पर्यंतचे सर्वेक्षण आणि तिसर्‍या वर्षी 25 चौरस कि. मी. सर्वेक्षण करून प्रत्यक्ष उत्खननाला सुरुवात करता येणार होती. यातील हवाई सर्वेक्षण व्यवस्थित पार पडले. मात्र, इतर सर्वेक्षणे करण्याचा एरिया नक्षल प्रभावित भागात असल्याने अडथळे आले. परिणामी, पाचपैकी चार भागातील पूर्व पाहणी परवाने कंपन्यांनी उत्खनन करणे शक्य नसल्याचे सांगत परत केल्याची माहिती या अधिकार्‍याने दिली. भोसले राजवटीत गडचिरोली जिल्हय़ात हिरे काढण्याचा प्रयत्न झाला होता.

पूर्व पाहणी आणि उत्खनन परवान्याची मुदत तीन वर्षांची असताना नागपूर वनविभागाने 18 नोव्हेंबर 2011 ते 18 नोव्हेंबर 2012 या एका वर्षाची परवानगी दिली. दरम्यान, उमरेड-कर्‍हांडला हे नवे अभयारण्य जाहीर झाले. गोल्ड बेल्टचा भाग या अभयारण्याच्या परिसरात येत असल्याने कंपनीचा तीन कोटींचा खर्च वाया गेल्याचे देवराजन यांनी सांगितले. कंपनीने अभयारण्याच्या कोअर एरियाला लागून असलेल्या बफर झोनमधील 10 स्क्वेअर कि. मी. एरियात उत्खननाला परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याच्या उद्योग सचिवांना लिहिलेल्या पत्रातून केली. परंतु, ती मान्य करण्यात आली नाही. येथे सोन्यासोबत टंगस्टन, तांबे व झिंकचेही साठे आहेत. जवळपास 7,700 कोटींचा झिंकचा साठा आता जमिनीखाली राहील. जीएसआय तसेच आयबीएमने यापूर्वी सुमारे 70 कोटी खर्च केले आहे, असे पत्रात नमूद केले आहे.

सोने व झिंक साठय़ाची किंमत दहा हजार कोटी
कोलारजवळ असलेल्या सोने व झिंक साठय़ाची किंमत 10 हजार कोटींची असल्याची माहिती जीओ म्हैसूर कंपनीचे उत्खनन व्यवस्थापक डॉ. एम. के. देवराजन यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. डॉ. देवराजन यांनी राज्याच्या उद्योग सचिवांना लिहिलेल्या पत्राची प्रतही ‘दिव्य मराठी’ला पाठवली.

भिवापुरात सोन्याचा पट्टा
नागपूर जिल्हय़ातील भिवापूरपासून जवळच असलेल्या कोलार येथील गोल्ड बेल्ट शोधण्याचे हेतुपत्र जीओ म्हैसूर सर्व्हिसेस प्रा. लि. या बंगळुरूस्थित कंपनीला देण्यात आले. कंपनीने या पट्टय़ाचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, कंपनीचा प्रत्यक्ष उत्खनन करण्याचा प्रस्ताव होता. जीओ म्हैसूर या कंपनीने ऑस्ट्रेलियन कंपनीशी सहकार्य होते. कंपनीने 23 चौरस कि. मी. साठी प्रॉस्पेक्टिंग लायसन (पूर्वेक्षण परवाना) अर्ज केल्यानंतर कंपनीला प्रत्यक्ष उत्खनन करण्याची परवानगी मिळाली.