आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाचा गंध नसलेल्या गावातून घडवले राष्ट्रीय खेळाडू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - खेळाचा गंध नसलेल्या गावामधून एका क्रीडा शिक्षकाने एक, दोन नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील तब्बल १५ खेळाडू घडवण्याची किमया साधली आहे. उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून खेळाची गोडी निर्माण करीत मागील आठ वर्षांत येथील तब्बल २३० विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
स्वखर्चाने शिबिर घेत शरद गढीकर या क्रीडा शिक्षकाने भरारी घेणारे गुणवंत खेळाडू घडवले आहेत. अमरावती शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या कुंड सर्जापूर येथील दहा वर्षांपूर्वी खेळाप्रती स्थिती वेगळी होती. मात्र, ग्रामीण भाग असतानादेखील मागील आठ वर्षांत क्रीडा जगतात या गावाने वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
अर्थात त्याचे श्रेयदेखील क्रीडा शिक्षक शरद गढीकर यांनाच द्यावे लागेल. कुंड सर्जापूर येथील चंद्रभानजी विद्यालयात शरद गढीकर हे शारीरिक शिक्षक म्हणून २००७ मध्ये रुजू झाले. गावात चंद्रभानजी विद्यालयाची निर्मिती ही सप्टेंबर १९६९ ला झाली. मात्र, यादरम्यान शाळेला शारीरिक शिक्षक मिळाले नाहीत. तब्बल ३८ वर्षांनंतर गढीकर शारीरिक शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर गावातील खेळाप्रती चित्र पालटत गेले.
शाळेत बासरी ड्रमच्या तालावर राष्ट्रगीत होऊ लागले, तर रुजू झाल्याच्या पहिल्याच वर्षी म्हणजेच २००७ मध्येच उन्हाळी शिबिर घेण्याचा निश्चय केला. क्रीडा शिबिर म्हटले, की साहित्य आणि खर्च आलाच, मात्र खर्चाची तमा बाळगता मित्रांच्या मदतीने उन्हाळी शिबिर घेण्याचे नियोजन करण्यात आले. खर्चिक नसलेल्या खेळांची निवड शिबिरासाठी करण्यात आली. त्यामध्ये कबड्डी, खो-खो, सॉफ्टबॉल, टेनिक्वाइट (रिंग टेनिस), बेसबॉल, स्पीडबॉल आदी खेळांचा समावेश करण्यात आला.
आज मितीला शिबिरात योगा, कबड्डी, खो-खो, सॉफ्टबॉल, टेनिक्वाइट, बेसबॉल, स्पीडबॉल, रोप स्किपिंग, लगोरी, लंगडी, लेझीम, बँड, बासरी प्रशिक्षण, स्पोर्ट डान्स, पेट अँड क्यू आदी खेळांचा समावेश करण्यात आला आहे. गावापेक्षा वेगळे खेळ खेळण्यास मिळणार असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांमध्येदेखील गोडी निर्माण झाली. तात्पर्य म्हणून पहिल्या वर्षी ४० संख्या असलेले शिबिर आता २५० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे. साहजिकच गढीकर यांचा यात मोलाचा वाटा आहे, मात्र शिबिरात प्रशिक्षक म्हणून येणारे त्यांचे मित्र अजय पुसतकर यांचे योगदान तेवढेच महत्त्वाचे आहे.
श्रीराम मंदिर ट्रस्ट शाळा समितीचे अध्यक्ष दिलीपबाबू इंगोले आणि चंद्रभानजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एल. एस. गावंडे यांच्या प्रेरणेशिवाय गढीकर यांना हे यश संपादन करणे अशक्य होते. विद्यार्थ्यांना क्रीडा संस्कार देण्यासोबत यशाची वाट दाखवणारे शिक्षक गढीकर यांचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार २०१४-१५ तसेच जिल्हा युवा पुरस्कार देऊन शासनाच्या वतीने गौरव करण्यात आला आहे.

असा आला मल्लखांब : आठ वर्षांपूर्वी शिबिरातील विद्यार्थ्यांना मल्लखांबचे प्रशिक्षण देण्याचे ठरवण्यात आले. मात्र, गावात मल्लखांब आणायचा कोठून, हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, दिलीपबाबू इंगोले यांनी त्यांच्या वाड्यात असलेल्या जुन्या लाकूडफाटा उपलब्ध करून दिल्याने मल्लखांब निर्माण झाला. अशाप्रकारे मल्लखांब शिबिरासाठी प्राप्त झाला.
राज्यस्तरावर गेला संघ
शिबिरातून विद्यार्थ्यांना सॉफ्टबॉल बेसबॉलचे प्रशिक्षण दिल्यानंतर शालेय स्पर्धेसाठी चंद्रभानजी विद्यालयाचा संघ मैदानात उतरला. संघ पहिल्याच वर्षी जिल्हा स्तरावर खेळला, तर २००८ मध्ये ब्रांझपदकदेखील प्राप्त केले. या विद्यालयाचा सॉफ्टबॉल बेसबॉलचा संघ मागील आठ वर्षांपासून जिल्हा स्तरावरील विजेता संघ ठरला आहे. शिवाय सातत्याने राज्यस्तरावरील स्पर्धेतदेखील खेळत आहे.

खेळाडू वर्ष स्पर्धा

पवनसैरिसे २०१०-११ पंजाब
चेतन माहोरे २००९-१० --
ऋतंबरा बोंडे २००९-१० --
प्रतीक्षा तायलकर २००९-१० चंदीगढ
सचिन गोंडाणे २०१२-१३ जळगाव
आकाश शेंडे २०१२-१३ मध्य प्रदेश
विक्की सैरिसे २०१३-१४ छत्तीसगड
वैष्णवी पेढेकर २०१३-१४ मध्य प्रदेश
गोकूल तायलकर २०१४-१५ मध्य प्रदेश
वैष्णवी मानकर २०१४-१५ मध्य प्रदेश