आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अठरा दिवसांच्या बाळाला चटके देण्याचा प्रकार तत्काळ बंद करा, अंनिसचे जिल्हाधिकारी गित्ते यांना निवेदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोटदुखीच्या आजारातून बरे करण्याच्या नावाखाली अठरा दिवसांच्या बाळाला चटके देणारे मेळघाटमधील अघोरी प्रकार त्वरित बंद होण्यासाठी कठोर कारवाई करावी ,अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घालण्यात आले असून, तशा आशयाचे निवेदनही देण्यात आले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भ संघटन सचिव मंगेश खेरडे यांच्या नेतृत्वात अंनिसच्या एका प्रतिनिधी मंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. या वेळी ही मागणी करण्यात आली. चिखलदरा तालुक्यातील माडीझडप येथील बाळाला लालबुंद सळईचे चटके दिल्यामुळे त्याची प्रकृती खालावली. सध्या हा बाळ नागपूर येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
वैद्यकीय क्षेत्र प्रचंड विस्तारलेले असतानाही मेळघाटात डाग देणे, मंत्र-तंत्राच्या आधारे उपचार करणे असे अघोरी प्रकार घडतात. यामुळे अनेकदा मृत्यूही ओढवला आहे.
तरीही आदिवासी-कोरकू समाजातील नागरिक ‘भूमका’ आदींच्या नादी लागून उपचार करवून घेतात. ही कृती त्यांच्यातील अज्ञानाचे द्योतक असली, तरी संबंधितांच्या वाईट मनसुब्यांना खतपाणी घालणारी आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई केली जाणे, आवश्यक असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणे आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा सहसंघटक हरीश केदार, महानगर संघटक विजय कुळकर्णी, प्रसिद्धी सचिव अजय केने राजेंद्र भांबोरे आदी सहकारी उपस्थित होते.

जादूटोणा विरोधी कायद्याचे प्रकरण

लालबुंद सळईने डाग देणे हा प्रकार अनिष्ट, अघोरी प्रथा जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा आहे. या कायद्याच्या कलम दोन (ख) मधील तरतुदींनुसार संबंधित मांत्रिक दोषी ठरतो. त्यामुळे माडीझडप येथील त्या मांत्रिकावर संबंधित कायद्यान्वये कारवाई करावी, अशीही अंनिसची मागणी आहे.

गृहमंत्र्यांनाही दिले पत्र

मेळघाटातील या घटनेची माहिती राज्याच्या गृहमंत्र्यांनाही देण्यात आली आहे. आदिवासी-कोरकूबहुल क्षेत्रातील नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा उचलत त्यांचा बळी घेणे हा प्रकार सर्रास घडतो, असा उल्लेख या पत्रात करण्यात आला असून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर लागू करण्यात आलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जावी, असे अंनिसचे म्हणणे आहे.