आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरात 24 तास पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. वर्षअखेर निम्म्या शहराला दिवसाला 24 तास पाणी (अराउंड द क्लॉक) मिळणार आहे. त्यासाठी नगरोत्थान योजनेंतर्गत प्रस्ताव तयार करण्यात आला असून, नगरविकास मंत्रालयातर्फे तो लवकरच मंजूर केला जाणार आहे.

‘अराउंड द क्लॉक’ पाणी देण्याचा हा प्रवास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे वर्षभरापूर्वी सुरू झाला होता. सध्या तो अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मार्च 2014 अखेर त्याला मंजुरी मिळेल, असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. ‘अमरावती शहराची वाढीव पाणीपुरवठा योजना’ असे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नाव आहे. त्या अंतर्गत पाणी साठवण्यासाठी चार नवे जलकुंभ, पाण्याची उचल ज्या ठिकाणाहून केली जाते तेथे सहा नव्या विद्युत पंपांची जोडणी, अडीचशे किलोमीटर लांबीची शहरांतर्गत पाइप लाइन व 32 दशलक्ष लिटर पाण्याचे नवे जलशुद्धीकरण केंद्र तयार करावे लागणार आहे. यासाठी 44 कोटींपैकी निम्मी रक्कमच शासन देणार असल्याने उर्वरित रकमेसाठी कर्जरोखे उभारण्याची तयारीही मजीप्रने केली आहे. हुडकोकडे कर्जमागणी प्रस्तावसुद्धा पाठवण्यात आला. शासनाने एकदा योजनेवर शिक्कामोर्तब करून वाढीव पाणीपुरवठा योजनेला हिरवा कंदील दाखवला, की अमरावतीवासीयांसाठी स्वप्नवत ठरणारा हा प्रकल्प प्रत्यक्ष अंमलात येईल.

पाण्याचे आरक्षण आधीच केले
अमरावती, बडनेरा व रहाटगावसह संपूर्ण क्षेत्राला लागणारे पाणी आधीच आरक्षित केले गेले आहे. वर्षाला 50 दशलक्ष घनमीटरहून अधिक पाणी लागेल, असा अंदाज बांधून तेवढे पाणी सिंभोरा धरणात आरक्षित केले आहे. प्रत्यक्षात आपला वापर 33 दशलक्ष घनमीटरपेक्षा जास्त नाही. त्यामुळे तेवढय़ाच पाण्यासाठीची रक्कम आपल्याला सिंचन विभागाला द्यावी लागते. पाण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. अरविंद सोनार, उपविभागीय अभियंता, मजीप्रा.

सर्व वस्त्यांना पाणी मिळणे गरजेचे
वर्षअखेर निम्म्या अमरावती शहराला पाणी मिळेल, ही आनंदाची बातमी आहे. सर्व वस्त्यांना पाणी मिळेल, अशी व्यवस्था होणे गरजेचे आहे. शहरातील काही भाग अजूनही अविकसित असल्याने तेथे मजीप्राची पाइप लाइन पोहोचली नाही. भविष्यातील योजना तयार करताना त्यात याही वस्त्यांचा समावेश व्हावा व सर्व अमरावतीकरांना बोअरऐवजी मजीप्राचे गोड पाणी प्यावयास मिळावे, यासाठी प्रयत्न हवेत. अशोक सोनारकर, नागरिक, अमरावती.

आपल्याला ही बातमी कशी वाटली, हे 9200012345 या मोबाइल क्रमांकावर एसएमएसने कळवा. आधी dmmh टाईप करून नंतर आपला अभिप्राय नोंदवा.